स्वत:च्या अनेक सामाजिक व राजकीय विषयांवरील व्हिडीओंमुळे चर्चेत असणारा मराठी अभिनेता म्हणजे शशांक केतकर (Shashank Ketkar). शशांक त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर वक्तव्य करताना दिसतो. रस्ते, त्यावरील खड्डे, कचरा, प्रदूषण किंवा अगदी आता झालेलं कुणाल कामरा प्रकरण असो… शशांक कायमच त्याच्या सोशल मीडियाद्वारे या विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतो. विशेष म्हणजे त्याने केलेल्या तक्रारीनंतर अनेकदा प्रशासनाकडूनही दखल घेतली गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

अशातच शशांकने आता पुन्हा एकदा त्याच्या राजकीय व सामाजिक विषयांवरील वक्तव्यांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. बसूनच बोलू विथ सखी या यूट्यूब वाहिनीवर त्याने याबद्दल त्याचे मत व्यक्त केले. यावेळी शशांकने, “मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि ते मांडण्याची माझी जी भाषा आहे, ती कुणाला लागणार नाही याचा मी पन्नास वेळा विचार करतो. माझा कुठलाही व्हिडीओ काढून पाहिलात किंवा माझं कुठलंही वक्तव्य तुम्ही बघितलं, तर त्यात थेट बोललेलं नाही किंवा कुणाचा अपमान करण्याचा माझा हेतू नसतो. त्यातून काहीतरी बोध मिळेल हाच माझा हेतू असतो. यातून मला नेमकं म्हणायचं काय आहे, हाच विचार मी कायम करतो”, असे म्हटले.

पुढे त्याने म्हटले, “अनेक दिवसांपासून मढच्या रस्त्यांची जी अवस्था होती, त्याबद्दल मला मढच्या गावातल्या अनेक लोकांचे ‘तू बोललास म्हणून आमच्या दु:खाला वाचा फुटली’, असे मेसेज आले आहेत. त्याशिवाय फिल्मसिटीचा कचरा याबद्दलसुद्धा अनेक मेसेज आले. त्यासाठी मी महानगरपालिकेचे आभार मानेन की, त्यानंतर झालेल्या प्रत्येक मीटिंगचे त्यांनी मला मेल केले आहेत. त्यामुळे तुम्ही कुठल्या पद्धतीने ते मुद्दे मांडत आहात हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे असे काही कलाकार आहेत, जे खूप चुकीच्या पद्धतीनं हे मुद्दे मांडतात आणि मग विचित्रपणे ट्रोल होतात. मला ट्रोल होण्यासाठी हे काही करायचं नाहीय.”

त्यानंतर शशांकने, “आज २०२५ मध्ये आपल्या शहरांची अवस्था सगळीकडे बॉम्ब पडल्यासारखी झाली असेल, तर आपण हिरोशिमा आणि नागासाकीसारखे केव्हा होणार आहोत? तिकडे खरे बॉम्ब पडूनही त्यांचा इतका विकास आहे. मग आपण सतत बॉम्ब पडल्यासारखे का आहोत? सतत कुठेतरी खणलेलंच आहे, सतत धूळच आहे. म्हणजे सिगरेट ओढा; पण यात श्वास घेऊ नका, अशी अवस्था आहे. पुढची पिढी यात वाढणार आहे का? आपल्याकडे चुकीच्या दिशेनं गाड्या येतात. शाळेच्या गाड्या चुकीच्या दिशेनं येतात, त्यांच्यावर डंपर येऊन आपटत आहेत. नाहक बळी जात आहेत. मुलांचा जीव जातो आहे”, असे मत व्यक्त केले.

त्यानंतर शशांकने म्हटलेय, “आपल्याकडे जीव इतका स्वस्त आहे का? आपण याची काळजीच घेत नाही आहोत की, आपल्याकडे माणसं मरत आहेत. हे काय चाललं आहे? आम्ही महागड्या गाड्या घेतो आणि या रस्त्यांमुळे त्यांचं नुकसान होतं. तर त्याचे पैसे हे देणार आहेत का, हा प्रश्न आपण नाही, तर कुणी विचारायचा? ते षंढासारखे बसले आहेत. ते निर्माते होतात. अनेक राजकीय लोक निर्माते होत आहेत म्हणजेच ते या क्षेत्रात इंटरेस्ट घेतात. मग आपण त्यांच्या कामात इंटरेस्ट का नाही घ्यायचा?”

पुढे शशांकने, “आपल्याकडे देव, पोलिस, डॉक्टर, राजकीय लोकांची भीती घातली गेली आहे, ते मित्र झालेले नाहीत” असे म्हटले आहे. तसेच पुढे त्याने म्हटलेय, “त्यांच्याशी नीट संवाद साधला आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला, तर ते मित्र होऊ शकतात. लोकांना त्यातला फायदा सांगितला पाहिजे. आपण हे का आणि कुणासाठी करीत आहोत याबद्दल त्यांना सांगितलं गेलं, तर मला नाही वाटत तुम्ही ट्रोल होता.”