शशांक केतकर हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘हे मन बावरे’, ‘पाहिले न मी तुला’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये शशांकने काम केलं आहे. सध्या तो ‘मुरांबा’ या स्टार प्रवाहवरील मालिकेमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेता अनेक गोष्टींबद्दल त्यांचं मत स्पष्टपणे मांडत असतो. शशांकने नवरात्र उत्सवानिमित्त केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
नवरात्रीत प्रत्येक दिवसाच्या रंगाप्रमाणे महिला नऊ दिवस सुंदर पेहराव करतात. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान केले जातात. हा रंग सौंदर्य आणि निर्भयता दर्शवतो. आजच्या लाल रंगाला अनुसरून शशांकने खास पोस्ट केली आहे.
शशांक केतकर अनेक गोष्टींबाबत आपलं स्पष्ट मत मांडतो. बहुतांश नागरिक वाहतुकीच्या नियमांचं पालन करत नाही. अनेकदा लाल सिग्नल असूनही सुसाट गाड्या नेल्या जातात. अशा लोकांसाठी अभिनेत्याने सिग्नलचा फोटो शेअर करत त्यावर “निदान आज तरी लाल सिग्नलचा आदर करा.” असं कॅप्शन दिलं आहे. नवरात्रीच्या आजच्या लाल रंगावर आधारित शशांकची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
दरम्यान, शशांक केतकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच त्याने ‘स्कॅम २००३’ या हिंदी वेबसीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय शशांक ‘मुरांबा’ या मालिकेत अक्षय ही प्रमुख भूमिका साकारत आहे.