शशांक केतकरला छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखलं जातं. ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. शशांकने आजवर नाटक, मालिका, चित्रपट व वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या तो स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. कामाव्यतिरिक्त अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शशांक सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपली स्पष्ट मतं मांडत असतो. त्याने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर गोव्यातील समुद्रकिनाऱ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गोव्याच्या कलंगुट समुद्र किनाऱ्यावर ३१ डिसेंबरच्या रात्री नागरिकांची तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

शशांक हा व्हायरल व्हिडीओ शेअर करत लिहितो, “या रात्री समुद्राच्या पाण्यात अमृत मिळत असेल का? ३१ डिसेंबरला असं काय खास असतं?” अभिनेत्याने शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. “या व्हिडीओमध्ये समुद्रकिनारा सोडून इतर सगळ्या गोष्टी दिसत आहेत”, “या गर्दीत फिरण्यापेक्षा घरी बसलेलं बरं आहे”, “समुद्रकिनारा नव्हे तर ही गर्दी पाहून जत्रा सुरू आहे असं वाटतंय” अशा कमेंट्स युजर्सनी या व्हायरल व्हिडीओवर केल्या आहेत.

shashank ketkar
शशांक केतकरची पोस्ट

दरम्यान, यापूर्वी देखील शशांक केतकरने अशाप्रकारचे व्हायरल व्हिडीओ शेअर करून अनेक सामाजिक विषयांवर आपली मतं मांडली आहेत. त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या अभिनेता ‘मुरांबा’ मालिकेत अक्षय हे प्रमुख पात्र साकारत आहे.