Shashank Ketkar : गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक जागांवर होणारा कचरा, वाहतूक कोंडी याबाबत अनेक मराठी कलाकार आवाज उठवत असल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर अनेकदा संतप्त पोस्ट शेअर करत परिसरातील अस्वच्छतेविषयी आपलं स्पष्ट मत मांडत असतो. अभिनेत्याच्या संतप्त पोस्टनंतर पालिकेकडून ताबडतोब कारवाई देखील केली जाते. गेल्या आठवड्यातच शशांकने यासंदर्भातील एक मुद्दा उपस्थित केला होता. आता पुन्हा एकदा ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहून अभिनेत्याने सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
शशांक ( Shashank Ketkar ) या व्हिडीओमध्ये म्हणतो, “गूड मॉर्निंग सुप्रभात! दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि सगळीकडे छान रोषणाई, स्वच्छता केली जात आहे. आमच्या ठाण्यात सुद्धा घाणेकरांच्या चौकात खूप छान स्वच्छता आहे, तिथे रोषणाई केलीये. त्याठिकाणी एक डिजिटल स्क्रीन आहे तिथे अनेक बिल्डर्स, राजकर्त्यांच्या जाहिराती झळकताना आपल्याला दिसतात. तो चौक महत्त्वाचा असल्याने तिथे नेहमी स्वच्छता ठेवली जाते.”
हेही वाचा : ‘झी मराठी’वर नव्या मालिकांची नांदी! ‘लक्ष्मी निवास’ पाठोपाठ सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका, पाहा पहिली झलक
कचऱ्याचा ढीग पाहून शशांक केतकर काय म्हणाला?
“मात्र, तशीच स्वच्छता तिथून जवळच असलेल्या एका सोसायटीजवळ ठाणे महानगरपालिकेने ठेवलेली आहे का… अगदी दिवाळीच्या तोंडावर कशी स्वच्छता ठेवलीये हे मी तुम्हाला दाखवतो…मी खरंतर मॉर्निंग वॉकला गेलो होतो ऑक्सिजनच्या शोधात, तिथे अनेक जण फिरत आहेत फिटनेसच्या शोधात आणि ठाणे महानगरपालिका झोपलीये दिवाळीच्या आनंदात…” असं सांगत अभिनेत्याने ( Shashank Ketkar ) महानगरपालिकेला टोला लगावला आहे.
यानंतर शशांक मैदानाबाहेर असलेल्या कचऱ्याच्या ढीगाचा व्हिडीओ त्याच्या फॉलोअर्सना दाखवतो. यामध्ये दारूच्या बाटल्या, तंबाखू, प्लास्टिक, थर्माकॉलचा थर साचल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी शशांक म्हणतो, “थँक्यू ठाणे महानगरपालिका…तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! बघा काही जमतंय का…”
शशांकने हा व्हिडीओ शेअर करत याला, “थँक्यू! सर्वांनी ठरवलं तर देश असाच घाण राहू शकतो. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू… सगळे मिळून घाण करू. आली आली दिवाळी, असाच कचरा दिसूदे रोज सकाळी” असं उपरोधात्मक कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, शशांक केतकरच्या ( Shashank Ketkar ) व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांसह त्याच्या चाहत्यांनी अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. “शशांक तू फार चांगलं काम करत आहेस”, “आमच्यासारख्या सामान्य लोकांनी यावर आवाज उठवला तर कदाचित काही Action घेतली जाणार नाही. पण, केतकर तुम्ही तुमच्या fame चा उपयोग हा कल्याणकारी, देशाच्या, खऱ्या अर्थाने, प्रगतीसाठी करताय याबद्दल तुमचे मी आभार मानते.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.