शूटिंगसाठी दैनंदिन प्रवास करताना अनेक कलाकारांना वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागतो. अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली स्पष्ट मतं मांडताना दिसतात. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरिज अशा चारही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता शशांक केतकर सुद्धा नेहमीच सामाजिक स्थितीबद्दल विशेषत: रस्त्यावर पडलेला कचरा, वाहतूक कोंडीबद्दल भाष्य करताना दिसतो. सध्या शशांकने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“रस्त्याची अवस्था भयानक आहे हे माहीत असतानाही १२ वीच्या परीक्षेचं सेंटर इथे कशाला?” असं कॅप्शन देत शशांकने इन्स्टाग्रामवर एक सविस्तर व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबई महानगरपालिकेला टॅग करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच मढ आयलंड परिसरातील विदारक स्थिती, याठिकाणी रोज प्रवास करणाऱ्या कलाकारांना कसा त्रास होतो या गोष्टी सविस्तरपणे अभिनेत्याने त्याच्या व्हिडीओमध्ये मांडल्या आहेत.

शशांक केतकर काय म्हणाला?

शशांक म्हणतो, “नमस्कार! महानगरपालिका आणि सगळ्या राजकारणी मंडळींना माझा नमस्कार… आता प्रेक्षकही म्हणतील यालाच कसा सारखा ट्राफिकचा त्रास होतो. पण, त्रास तुम्हाला सुद्धा होतो… तुम्ही हा त्रास गप्प राहून सहन करता आणि मी बोलून सहन करतो. मुंबईचं स्पिरिट या नावाखाली आपणच आपल्याला जो काही त्रास करून घेतो ना… त्याबद्दल आता आपण विचार केला पाहिजे. कारण, या वाहतूक कोंडीच्या रांगेत उभ्या राहणाऱ्या शेकडो माणसांचा वेळ, जीव, कष्ट, प्रदूषणामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्या याची शून्य किंमत आहे. चित्रपटांमध्ये तुम्ही पाहता की मढ आयलंड हे मुंबईतलं अतिशय सुंदर ठिकाण आहे. पण, हे अजिबात सुंदर नाहीये… ते असं आहे. अनेक वर्षे मढच्या रस्त्यांची अत्यंत घाण अवस्था होती, आता कुठे कोणाला तरी जाग आलीये आणि सध्या काम सुरू केलेलं आहे. एक बाजू चालू ठेवतात, दुसरी खणतात…मग काम सुरू असताना अनेक ठिकाणी सळ्या बाहेर आलेल्या असतात, रस्ता व्यवस्थित नसतो, कचरा तर असतोच. या सगळ्या घाणेरड्या वातावरणात आम्ही प्रसन्न चेहऱ्याने याठिकाणी शूटिंगला कसे पोहोचतो हे आमचं आम्हाला माहिती…”

“काहीजण मला सांगतात अरे तू राजकारण आणि राजकारणी व्यक्तींबद्दल जास्त बोलायला जाऊ नकोस कारण, हे लोक डेंजर असतात. माझा या सगळ्यांना प्रश्न आहे की, त्यांच्यातली अनेक माणसं आमच्या इंडस्ट्रीत इंटरेस्ट दाखवतात मग, आपण त्यांच्या कामात इंटरेस्ट दाखवायला नको का? त्यांना त्यांच्या चुका दाखवायला नको का? आता एका बसचे कंडक्टर मला सांगत होते की, मागचे दोन तास ही वाहतूक कोंडी आहे. मी सुद्धा गेल्या अर्ध्या तासापासून ट्राफिकमध्ये थांबलोय. मागचे दोन ते तीन महिने मढ आयलंडच्या रस्त्यांची कामं सुरू आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण, आता झालंय काय… इथल्या एका शाळेत बारावीचं सेंटर आलंय. त्यामुळे लांबून आलेले पालक आपआपल्या गाड्या पार्क करून मुलांना सोडायला गेले आहेत. त्यात एकच लेन सध्या सुरू आहेत. इथेच सगळ्या गाड्या अडकून पडल्या आहेत. ही अशी गैरव्यवस्था नेहमी उद्भवते. पालिकेने जर हा सगळा विचार करून मढमधलं हे एक सेंटर नसतं दिलं…तर इतर शाळा तुमच्याकडे कमी आहेत का सेंटर म्हणून द्यायला? इथे रस्त्याची वाट लागलीये… आणि त्यात एक शाळा सेंटर म्हणून दिलीये. इथे बाहेरुन कामाला येणार लोक, इथे राहणारे लोक… या सगळ्यामध्ये होणारी ही वाहतूक कोंडी तुम्हाला पटतेय का?” असा सवाल शशांकने या पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.

दरम्यान, शशांक केतकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय “तुम्ही एक कलाकार म्हणून भारी आहातच…पण एक सामाजिक भान असलेला माणूस म्हणूनही खूपच भारी आहात”, “दादा बरोबर बोललास”, “राजकारणी लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचलाच पाहिजे” अशा कमेंट्स शशांकच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.