‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कालाय तस्मै नम:’, ‘हे मन बावरे’ अशा छोट्या पडद्यावरील मालिकांमधून अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. आजवर त्याने मालिका, नाटक, चित्रपट, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शशांक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. अनेकदा तो इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीवर भाष्य करतो. शशांकने याआधी सुद्धा मुंबईच्या रस्त्यावरची अस्वच्छता पाहून नाराजी दर्शवली होती. आता अभिनेत्याने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ देखील चर्चेत आला आहे.
शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्रामवर मुंबईतील रस्त्यालगत ठेवण्यात येणाऱ्या कचरापेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. कचरापेटीपेक्षा रस्त्यावर आजूबाजूला सर्व कचरा पसरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
शशांक केतकरची पोस्ट
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत अभिनेता शशांक केतकर संतापला
मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये !!!
मुंबईची @my_bmc filmcity बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ???? ही अवस्था , हे चित्र काही आजचं नाहीये… मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून BMC office समोर ओतला तर आवडेल? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरिक, सगळ्यांच्या माथी हा असला घाणेरडा परिसर का मारला आहे ?
हेही वाचा : सेटवर कडाक्याचं भांडण अन् गोपी बहूला केलेली शिवीगाळ; ‘साथ निभाना साथिया’तील अहम खुलासा करत म्हणाला…
दरम्यान, शशांक केतकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स करत अभिनेत्याला पाठिंबा दर्शवला आहे. “सगळ्यांनीच ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे आपण आपल्या घरात अशी घाण करू का?”, “हा व्हिडीओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”, “बघुया आता तरी सुधारतात का ते” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या व्हिडीओवर केल्या आहेत. याशिवाय अनेकांनी कमेंट्समध्ये मुंबई महानगरपालिकेला टॅग केला आहे. सामान्य युजर्सशिवाय मराठी कलाविश्वातील कलाकारांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत शशांकला पाठिंबा दर्शवला आहे.