Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ही गुडन्यूज म्हणजे अभिनेता लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी प्रियांका ढवळे गरोदर असून हे जोडपं या नवीन वर्षात त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहे. इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करत शशांकने ही गुडन्यूज त्याच्या सर्व चाहत्यांना दिली. सध्या संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. शशांक व प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे. ऋग्वेद, शशांक ( Shashank Ketkar ) व त्याची पत्नी प्रियांका या तिघांनी मिळून एकत्र मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.
शशांक केतकर व प्रियांका पुन्हा होणार आई-बाबा
शशांक ( Shashank Ketkar ) ही आनंदाची बातमी शेअर करत लिहितो, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झालो आहोत.”
शशांक व प्रियांका आई-बाबा होणार असल्याचं समजताच मराठी कलाकारांनी या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, तितिक्षा तावडे, तन्वी मुंडले, सुकन्या मोने, आशय कुलकर्णी, प्रियांका तेंडोलकर, सलील कुलकर्णी, अपूर्वा नेमळेकर या सगळ्या कलाकारांसह नेटकऱ्यांनी शशांकच्या पोस्टवर भरभरून कमेंट्स करत केतकर कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, शशांकच्या ( Shashank Ketkar ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’ वाहिनीच्या ‘मुरांबा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या मालिकेला प्रेक्षकांची सुद्धा चांगली पसंती मिळत आहे. शशांकसह या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रमुख भूमिकेत झळकली आहे.