Shashank Ketkar : गेल्या काही दिवसांत मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपण केलेल्या कामाचे पैसे मिळाले नसल्याने सोशल मीडियावर जाहीरपणे खंत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. कलाकार वेळेत काम करुनही निर्माते अनेकदा वेळेवर मानधन देत नाहीत. यामुळे कलाकारांचं आर्थिक नुकसान होतंच, शिवाय पैसे मिळेपर्यंत होणारा मनस्ताप वेगळा… या सगळ्या प्रक्रियेला वैतागून शेवटी कलाकार सोशल मीडियाचा आधार घेऊन आपल्या समस्या मांडणं योग्य समजतात.

सिनेविश्वात नाटक, मालिका, चित्रपट याशिवाय वेबसीरिजमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता म्हणून शशांक केतकरला ओळखलं जातं. त्याने आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय शशांक गेल्या काही वर्षात मराठीसह अनेक हिंदी प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा झळकला आहे. अभिनेत्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘गुनाह’ सीरिज गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचा पहिला भाग जून २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर आता दुसरा भाग ३ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र, दुसरा भाग आला तरी, पहिल्या भागाचे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते असं सांगत अभिनेता शशांक केतकरने ( Shashank Ketkar ) सोशल मीडियावर खंत व्यक्त केली होती.

शशांकने शुक्रवारी ( ३ जानेवारी ) सकाळी पोस्ट शेअर करत त्याला त्याचं मानधन वेळेत न मिळाल्याचं सांगितलं होतं. मात्र, निर्मात्यांवर केलेल्या आरोपांनंतर आता अभिनेत्याने एक नवीन पोस्ट शेअर करत निर्माण झालेले गैरसमज मिटले असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय संबंधित कंपनीची माफी देखील मागितली आहे.

शशांक म्हणाला, “गैरसमज दूर झालेले आहेत…माझ्या समस्येचं तात्काळ निवारण करण्यासाठी आभार. हे प्रकरणी मी सोशल मीडियावर सांगितलं यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.”

Shashank Ketkar
Shashank Ketkar

हेही वाचा : गोव्यात ड्रीम प्रपोज अन्…; प्रेमाची कबुली देत मराठी अभिनेत्याने दाखवला गर्लफ्रेंडचा चेहरा! होणारी पत्नी आहे सौंदर्यवती, तिचं नाव काय?

शशांक केतकरची पोस्ट, नेमकं काय घडलं होतं?

पहिल्या सीझनचे पैसे न मिळाल्याने शशांकने दुसऱ्या सीझनच्या डबिंगला नकार दिला होता. यामुळे त्याच्याऐवजी एका वेगळ्या डबिंग आर्टिस्टकडून काही सीन्ससाठी डब करुन घेण्यात आलं. असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

शशांक केतकर म्हणाला, “गुनाह सीझन २’ आजपासून सुरु पण…सीझन २ चं शूटिंग संपलं होतं तरी, सीझन १ चे पैसे परवापर्यंत मिळाले नव्हते आणि सीझन १ चे पैसे मिळाल्याशिवाय सीझन २ चं डबिंग करणार नाही.. अशी अट घातल्यामुळे अनेक सीन्समध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करुन घेतली आहेत. याविषयी डिटेलमध्ये बोलेनच…”

हेही वाचा : “माझ्याशी लग्न करायचं धाडस…”, नुपूर शिखरेचं आयरा खानबरोबर ‘आले तुफान किती…’ गाण्यावर रील; क्रांती रेडकरसह चाहत्यांना हसू आवरेना

Shashank Ketkar
अभिनेता शशांक केतकरची पोस्ट ( Shashank Ketkar )

आता शशांक ( Shashank Ketkar ) आता या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुरांबा’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

Story img Loader