सध्याच्या काळात सामान्यांपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत सर्व जण सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. सोशल मीडियामुळेच आपल्या आवडत्या कलाकारांविषयी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सहज जाणून घेता येते. कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो, व्हिडीओ, काही भावनिक पोस्ट पाहून, वाचून त्यांच्याबद्दलची अधिक माहिती मिळते. कलाकार अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्यातीलही काही खास क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. आता अभिनेता शशांक केतकरने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
शशांक केतकरने व्हिडीओ शेअर करीत आईला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
‘मुरांबा’ फेम अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या आईच्या मेकओव्हरचा आहे. या व्हिडीओमध्ये शशांक त्याच्या आईला पार्लरमध्ये घेऊन गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर शशांकने आईचे नवीन लूकमधील फोटोदेखील शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या आईचे काही सुंदर फोटोदेखील पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना शशांक केतकरने लिहिले, “हॅपी बर्थडे आई! आई होणं हे सगळ्यात अवघड आहे. म्हणूनच तू स्वतःचे लाड कर. करून घे,” असे म्हणत अभिनेत्याने आईला शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “आपली आई कुटुंबातील सर्वांची जागा घेऊ शकते; पण कुटुंबातील कोणीच आईची जागा घेऊ शकत नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “किती छान. लहानपणी आई मुलांचे संगोपन करते आणि मुलं मोठी झाल्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं तिची सेवा करतात. शशांक तर खूप गोड गुणी मुलगा आहे. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा शशांकच्या आईला.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “वडील घराचा आधारवड असतातच; पण त्या झाडाला येणारी फळे ही संस्कार, गुण देऊन परिपक्व करण्याचे काम आई करते. शशांक व दीक्षाकडे बघून हे जाणवते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केतकरकाकू! कायम हसत, निरोगी राहा. शतायुषी व्हा. शशांक, खूप छान आईचे लाड करतो आहेस. जे आई-वडिलांनी आपल्यासाठी केले, ते आनंदाने आपण केले, तर कुठल्याच गोष्टींची कमतरता राहत नाही.” अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा काकू, असे म्हटले आहे.
दरम्यान, शशांक सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मुरांबा’ या मालिकेत काम करताना दिसत आहे.