ज्या मालिकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो, कथा आवडतात, अशा मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात; दीर्घ काळापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘मुरांबा’ या मालिकेने ९०० भाग पूर्ण केले आहेत. या निमित्ताने मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणारा लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर व अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शशांक केतकर व शिवानी मुंढेकर दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शशांक व शिवानी म्हणतात, “नमस्कार, स्टार प्रवाह व ‘मुरांबा’ मालिकेच्या रसिक प्रेक्षकांना मी शशांक केतकर व शिवानी मुंढेकर व आमच्या संपूर्ण टीमकडून प्रेमाचा नमस्कार. खूप खूप थँक्यू. आजचं निमित्त खरंच खास आहे, बघता बघता ९०० भागांचा टप्पा आमच्या मालिकेने गाठला आहे. शपथ सांगतो, फक्त या मालिकेचा मी छोटासा भाग आहे म्हणून नाही, पण खरंच ९०० भागांपर्यंतचा प्रवास कसा झाला, केव्हा झाला कळलं नाही; कारण याचं एकच आहे ते म्हणजे तुम्हा रसिक प्रेक्षकांचं आमच्यावरचं प्रेम आणि आमचे निर्माते व संपूर्ण टीम व स्टार प्रवास यांचा जो काही पाठिंबा, यामुळे आमचा इथपर्यंतचा प्रवास छान, सुखकर झाला. गोष्टींमध्ये खूप चढ-उतार येत होते, आम्ही त्याचा आनंद घेत होतो. खरंतर खूप भावुक व्हायला होत आहे. बघता बघता ९०० चा टप्पा गाठला. आता फक्त एक सेंच्युरी बाकी आहे, ते झालं की हजारही भाग होतील. मला आमच्या वाहिनीला, निर्मात्यांना व सह कलाकारांना थँक्यू म्हणायचं आहे. कॅमेऱ्याच्या मागे जी आमची टीम प्रचंड कष्ट करत असते, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे.”
पुढे शिवानीने म्हटले, “आपल्या मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाले आणि हा टप्पा कसा पार पडला हे मला कळलं नाही. ही माझी पहिलीच मालिका आहे. आपल्या पहिल्या कामाचा इतका मोठा टप्पा पूर्ण होणं ही खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. तुमचं आमच्यावर प्रेम असंच राहू दे, पूर्ण टीमकडून धन्यवाद.”
हेही वाचा: ना मराठी, ना बॉलीवूड…; प्राजक्ता माळीचा क्रश आहे ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता! म्हणाली, “आधी मला…”
‘मुरांबा’ मालिका ही प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. या मालिकेत रमा-रेवाची मैत्री सुरुवातीला पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर त्यांच्या मैत्रीत कडवटपणा आलेला दिसला. रमा-अक्षयच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकले. अनेकदा त्यांना संकटांचा सामना करावा लागला. मात्र, प्रत्येक वेळी त्यांनी एकत्र त्याचा सामना केला. नुकतेच मालिकेत पाहायला मिळाले की, रेवाचे सत्य त्यांनी सर्वांसमोर आणले व तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. गेले अनेक दिवस ते रेवाचे सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न करत होते. आता अनेक संकटांवर मात करत ते एकत्र आले आहेत.
आता ‘मुरांबा’ मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.