Shashank Ketkar Son Rugved : ‘हे मन बावरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘कालाय तस्मै नम:’ अशा अनेक मालिकांमधून अभिनेता शशांक केतकर घराघरांत लोकप्रिय झाला. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज (ओटीटी) अशा चारही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या शशांक स्टार प्रवाहच्या ‘मुरांबा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

शशांक केतकर आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधू घेतलं आहे. शशांकने त्याच्या चार वर्षांच्या लेकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

शशांक केतकरचा लेक ऋग्वेदने आपल्या आईच्या साथीने बाबासाठी खास थालीपीठ बनवल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. अभिनेता लिहितो, “मला खूप भूक लागली होती. प्रियांका म्हणाली, पटकन थालीपीठ करते! म्हटलं कर… तितक्यात ऋग्वेद स्वयंपाक घरात आला आणि म्हणाला “मी मदत करतो” आणि पठ्ठ्यानी खरंच मदत केली!”

“लहान मुलांना आनंदी आणि व्यग्र राहण्यासाठी भरमसाठ खेळणी नाही… हे असं काहीतरी खाद्य लागतं डोक्याला. किती मजा ना! ऋग्वेदने केलेला आणखी एक पदार्थ बघायला आवडेल?” अशी पोस्ट शेअर करत शशांकने त्याच्या लाडक्या लेकाचं कौतुक केलं आहे.

शशांकच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “याला म्हणतात खरे संस्कार”, “खूप मस्त! ऋग्वेदला अभ्यासाबरोबर हे पण शिकवताय खूपच छान”, “अरे ऋग्वेद किती गोड”, “हल्ली ऋग्वेदच्या वयाची मुलं टीव्ही आणि मोबाइल पाहतात हा व्हिडीओ पाहून खूपच छान वाटलं.” अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, शशांकने वैयक्तिक आयुष्यात ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न केलं. शशांक व प्रियांका यांनी २०२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद असं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच शशांकला मुलगी झाली. त्याने लेकीचं नाव ‘राधा’ असं ठेवलं आहे.