लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)च्या लग्नाला नुकतीच सात वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्याने त्याच्या पत्नीसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. आता अभिनेत्याने लग्नाचा वाढदिवस साजरा केलेला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका खास कारणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शशांक केतकरच्या मुलाचे बोबडे बोल ऐकलेत का?
अभिनेत्याने सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक केक दिसत असून, त्यावर ‘प्रिशा’ असे लिहिले आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या मुलाचा आवाज ऐकू येत आहे. तो म्हणतो, “हे आई-बाबा आहेत. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे म्हणून हा चॉकलेट केक त्यांच्यासाठी आणला आहे.” हा व्हिडीओ शेअर करताना शशांकने लिहिले, “आमची अॅनिव्हर्सरी यापेक्षा गोड नोटवर संपूच शकत नाही! आम्हा दोघांनाही भरभरून शुभेच्छा आणि प्रेम देणाऱ्या सगळ्यांना मनापासून थँक्यू.”
शशांकच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत त्याच्या मुलाच्या आवाजाचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने लिहिले, “ऋग्वेदचा आवाज किती गोड आहे. पण, आम्हाला ऋग्वेदला बघायचे आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “किती छान आवाजात ऋग्वेद आई-बाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा शब्द बोलतोय. ऐकताना किती गोड वाटतोय. शशांक-प्रियांका तुमचा आता खरा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “किती गोड आवाजात आई-बाबांना शुभेच्छा दिल्या.” तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.
४ डिसेंबरला शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये पत्नी प्रियांकाबरोबरचे त्याचे फोटो पाहायला मिळाले होते. ही पोस्ट शेअर करताना त्याने जी कॅप्शन लिहिली होती, ते चाहत्यांना आवडल्याचे कमेंट्समधून दिसत होते. त्याने लिहिले होते, “फक्त ७ वर्ष झाली. बाकी सगळं जग एका बाजूला आणि तुझ्यावरचं प्रेम, तू एका बाजूला.”
शशांक केतकरच्या कामाबद्दल बोलायचे, तर सध्या तो मुरांबा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणारी मुरांबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. शशांकने यामध्ये अक्षय ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील रमा-अक्षय ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सध्या मालिकेत रमा-अक्षयच्या आयुष्यातून संकट दूर झाल्याचे दिसत आहे. ते एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करताना समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये पाहायला मिळाले होते. आता मालिकेत पुढे काय होणार, रेवा कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यातून जाणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.