‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या नवीन वळण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजूच्या आयुष्यात नेमकं काय होणार, अशी उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात सुरू होती. आता डॅडींचा प्लॅन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला असून तेजूच्या आयुष्यात नवीन वळण आल्याचे पाहायला मिळत आहे.
सूर्याने केली बहिणीची पाठवणी
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, गुरुजी सांगतात मुलीचे मामा मुलीला घेऊन या; त्यानंतर सूर्याचे संपूर्ण कुटुंब तेजूसह मंडपात येते. त्याचवेळी शत्रूदेखील तेजूसमोर येतो. तेजूचे लग्न शत्रूबरोबर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तेजू दु:खी असल्याचे दिसत आहे. सूर्या तेजूला समजावून सांगतो, “अगं डॅडीसारखा देवमाणूस तुझा सासरे आहेत. ते तुझी लय काळजी घेतील. ते तुला कशाचीच कमी पडू देणार नाहीत. तुला काय वाटलंना या भावाला हाक मारायची, हा भाऊ कुठेही असेल तर लगेच हजर राहील.” यादरम्यान तेजूचे शत्रूबरोबर लग्न झालेले दिसत असून सूर्या तिची पाठवणी करतानादेखील दिसत आहे. शत्रू व डॅडी यांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मितहास्य पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सूर्याच्या लाडक्या बहिणीच्या आयुष्यात नवं वळण येणार, शत्रूशी तेजूचं लग्न होणार.”
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील तुळजाचे वडील ज्यांना सर्व जण डॅडी म्हणून ओळखतात, समाजातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचे तुळजाचे लग्न सत्यजितबरोबर ठरवले आहे, मात्र तिचे दुसऱ्याच मुलावर प्रेम असल्याने ती तिच्या लग्नातून सूर्याच्या मदतीने पळून जाते, त्यामुळे डॅडींचा अपमान होतो. जेव्हा सूर्या व तुळजा परत येतात तेव्हा त्यांचे लग्न लावून दिले जाते. आता त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी व शत्रूचे तेजूबरोबर लग्न लावून देण्यासाठी डॅडींनी एक प्लॅन बनवला. तुळजासह सूर्याच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी त्यांच्या गोड वागण्याने विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांनी तेजूसाठी एक स्थळ आणले. पिंट्या ऊर्फ समीर निकम याला त्यांनी तुरुंगातून पॅरोलवर सोडवून आणले व तिचे स्थळ त्यांनी तेजूसाठी आणले. त्यांचा हा प्लॅन होता की ऐन लग्नावेळी समीर मंडपातून गायब होईल व त्याजागी शत्रू तेजूबरोबर लग्न करेल. आता डॅडींचा प्लॅन यशस्वी झालेला या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आता तेजू शत्रूबरोबर लग्न स्वीकारू शकणार का? तिला सासरमध्ये चांगली वागणूक मिळणार का? डॅडींचा हा प्लॅन कोणासमोर उघड होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.