टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि मालिकेतील सह-कलाकार शिझान खान सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं असून कोर्टाने त्याची कोठडी १४ दिवसांपर्यंत वाढवली आहे. दुसऱ्यांदा त्याच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणावर पहिल्यांदाच शिझान व्यक्त झाला आहे. शिझान निर्दोष आहे आणि त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असं त्याचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी त्याच्या वतीने कोर्टात सांगितलंय.
“…तर शिझान आत्महत्या करू शकतो” तुनिषा शर्मा प्रकरणाबाबत अभिनेत्याच्या वकिलाचं मोठं वक्तव्य
वसई न्यायालयात हजर करण्यापूर्वी शिझान खानने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याने आमच्याशी संवाद साधला आणि सांगितलं की त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे,” असं त्याचे वकील मिश्रा यांनी शनिवारी वसई न्यायालयातून बाहेर पडताना एएनआयला सांगितले. “माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी निर्दोष आहे, ‘सत्यमेव जयते’,” असं शिझान म्हणाला. मिश्रा यांच्या मते, ते आज सोमवारी कोर्टात या खटल्यासंदर्भात पहिला जामीन अर्ज दाखल करतील. “आम्ही खटल्याशी संबंधित काही प्रमाणित कागदपत्रांसाठी अर्ज केला आहे. त्यानुसार आम्ही सोमवारी पहिला जामीन अर्ज दाखल करू,” असे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी एएनआयला सांगितले. शुक्रवारी दिवशी वसई न्यायालयाने खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
शिझानच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना त्याच्या मानसिक स्थितीचाही उल्लेख केला होता. यावेळी ते म्हणाले, “ज्या मुलाने संपूर्ण आयुष्यामध्ये कधीच पोलिीस व कोर्ट पाहिलं नाही. अचानक संपूर्ण मीडियाने त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्याची मानसिक परिस्थिती ठीक नाही, त्यामुळे कोठडीत त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावं,” अशी मागणी त्यांनी केली होती.