‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ या मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती. शिझान दोन महिने तुरुंगात होता, त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तुनिषाच्या आत्महत्येमुळे शिझानला मालिका गमवावी लागलीच मात्र, त्याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रोहित शेट्टीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या सीझनमध्ये शिझान सहभागी होणार असून यासाठी संपूर्ण टीम परदेशी रवाना होणार आहे. परंतु त्याआधीच शिझानला नव्या शोमध्ये सहभागी करून घेण्याच्या निर्णयावर तुनिषाच्या आईने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : १५ वर्षांनंतर ‘गजनी’च्या सिक्वेलसाठी आमिरची तयारी? अल्लू अर्जुनशी आहे खास कनेक्शन
तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिझान खानवर आत्महत्येस प्रवृत्त केल्यासह इतर अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे तुनिषा शर्माच्या आईच्या मते, “ज्या आरोपीला नुकताच न्यायालयाने जामीन दिला आहे, तो आरोपी एखाद्या कार्यक्रमात सहभागी कसा होऊ शकतो? हे पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. हे आयपीसी कलम ३०६ च्या विरोधात आहे. पोलिसांनी सादर केलेल्या ५२४ पानी आरोपपत्राचे काय झाले? लोक गुन्हे करतात आणि मग अशा कार्यक्रमांमधून पुन्हा चमकण्याचा प्रयत्न करतात.” या संपूर्ण प्रकरणी तुनिषाची आई नाराज झाली असून तिने संबंधित वाहिनीला नोटीस पाठवली आहे. याला तुनिषाचे काका पवन शर्मा यांनीही दुजोरा दिला आहे.
हेही वाचा : रणबीर आणि रणवीरच्या बॉलीवूड पदार्पणानंतर घाबरला होता आयुष्मान, म्हणाला…
तुनिषा शर्माने गेल्या वर्षी ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली होती. तुनिषाच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आत्महत्येसाठी तिचा सहकलाकार शिझान खान याला जबाबदार ठरवून अटक करण्यात आली होती. यानंतर जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ शिझान तुरुंगात होता. ५ मार्चला शिझानला जामीन मंजूर करण्यात आला.