अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तिचा प्रियकर आणि मालिकेतील सहकलाकार शिझान खानला याला अटक केली आहे. त्याच्यावर तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. शिझानने प्रेमसंबंध तोडल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने केली आहे. दरम्यान एफआयरआमध्ये प्रेमसंबंध तुटल्याने तुनिषा तणावात होती असा खुलासा झाला आहे.
शिझानवर भारतीय दंड विधान कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला वाळीव पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी त्याला वसईमधील न्यायालयापुढे नुकतंच हजर केलं. यादरम्यान शिझानच्या वकिलांनी यावर वक्तव्य केलं आहे. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिझानचे वकील शरद राय म्हणाले, “जे काही घडलं त्या प्रकरणात न्यायालय आणि पोलिस जातीने लक्ष घालत आहेत. शिझानला कोर्टासमोर हजर केलं आहे. त्याच्यावर लागलेले आरोप बिनबुडाचे आहेत.”
यानंतर शिझानला ४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसही या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. शिवाय गेल्या २४ तासात तुनिषा कोणाच्या संपर्कात होती, तिने कोणाशी फोनवर संपर्क साधला त्या सगळ्यांची चौकशी होत असून जबाब नोंदवले जात आहेत.
सध्या सब टीव्ही मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.