टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील दोन कलाकारांना निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या दोघांनाही मालिकेतून काढल्यानंतर त्यांनी नवीन कलाकार घेतले असून नव्या कलाकारांनी मालिकेचं शूटिंग सुरू केलं आहे. शहजादा धामी व प्रतीक्षा होनमुखे अशी काढलेल्या कलाकारांची नावं आहेत. ते अरमान व रुही या भूमिका साकारत होते.
निर्माते राजन शाही व डीकेपी यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन दिलं आहे. “सेटरवर सकारात्मक वर्क कल्चर टिकवून ठेवण्यास प्रॉडक्शन हाऊसने नेहमीच महत्त्व दिलं आहे. पण अलीकडे घडलेल्या काही घटनांमुळे कट प्रॉडक्शनला टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील दोन कलाकारांना बाहेर काढण्यात आलं आहे. अरमानची भूमिका साकारणारा शहजादा धामी आणि रुहीची भूमिका करणारी प्रतीक्षा होनमुखे यांना अनप्रोफेशन वागण्यामुळे शोमधून बाहेर काढण्यात आलं आहे,” असं या निवेदनात म्हटलं आहे.
शहजादा व प्रतीक्षा या दोघांची खऱ्या आयुष्यात जवळीक वाढली होती. त्यांच्या नात्यामुळे प्रॉडक्शन हाऊस आणि इतर कलाकारांना अडचणी येत होत्या. दोघेही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत होते, त्याचा अनेकदा शूटिंगवर परिणाम होत होता. इतकंच नाही तर दिवसेंदिवस या दोघांचे नखरे वाढत होते, त्यामुळे त्यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, असं वृत्त ‘जागरण’ने दिलं आहे.
प्रतीक्षा व शहजादा हे दोघेही शोमधील मुख्य कलाकार होते. आता त्यांची जागा रोहित पुरोहित व गर्विता साधवानी घेणार आहेत, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, हिना खान व करण मेहरा यांच्या मुख्य भूमिकांसह ही मालिका २००९ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेला आता १५ वर्षे झाली आहेत. या काळात अनेक कलाकारांनी मालिकेतून एक्झिट घेतली, तर अनेक नवीन कलाकार आले, पण प्रेक्षकांकडून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने निर्मात्यांनी ती चालूच ठेवली आहे.