बिग बॉसचा १६ वा सीझन सध्या बराच गाजतोय. टीना दत्ता, शालीन भानोत, अर्चना गौतम यांच्याबरोबरच या सीझनमध्ये मराठमोळ्या शिव ठाकरेचीही जोरदार चर्चा आहे. शिव ठाकरेला या सीझनच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जातं. शिव नेहमीच खेळताना डोक्याचा वापर करतो असं घरातील सदस्यही बोलताना दिसतात. घरातील वाद, भांडणं, रुसवे- फुगवे, लव्ह अँगल या सगळ्यात नुकत्याच झालेल्या विकेंडला घरातील सदस्यांची एक वेगळी बाजूही समोर आली. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये शिव ठाकरेला अश्रू अनावर झाले आणि तो रडताना दिसला. नेहमीच खंबीर राहणाऱ्या शिवला रडताना पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
बिग बस १६ मध्ये सहभागी होण्याआधी शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सीझन जिंकला होता. त्यानंतर आता तो बिग बॉस १६चा सीझनही गाजवताना दिसतोय. प्रेक्षकांना त्याचा खेळ आवडत असल्याचंही दिसून येतंय तो अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतो. पण नेहमीच शांत आणि हसत खेळत राहणाऱ्या शिवबरोबर नेमकं काय घडलं की त्याला रडू कोसळलं?
आणखी वाचा- Video : राखी सावंत-आरोह वेलणकरमध्ये खडाजंगी, म्हणाला “तुझ्या बापाचं…”
कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात. ते म्हणतात, “मागच्या ९ आठवड्यांपासून तुम्ही सर्व तुमच्या कुटुंबियांपासून दूर आहात. त्यामुळे तुम्हाला घरच्यांची आठवण येत असणार, मनात बरंच काही साठलेलं असेल. तर आता तुम्हाला तुमच्या भावना माझ्याकडे व्यक्त करता येणार आहेत.” बिग बॉसच्या या टास्कच्या वेळी घरातील सर्वच सदस्य भावुक झालेले पाहायला मिळाले.
‘फॅमिली टास्क’च्या वेळी सर्व सदस्य कन्फेशन रुममध्ये बिग बॉससमोर आपलं मन मोकळं करताना दिसतात. तर शिव ठाकरेला यावेळी अश्रू अनावर होतात. तो रडत रडत म्हणतो, “सर्वांना वाटतं की मी डोक्याने खेळतो. मी खूप खंबीर आहे पण माझ्या घरच्यांनाच माहीत आहे की मी किती हळवा आहे. मी माझ्या मनाचं ऐकतो. मला त्यांच्यासमोर रडताही येत नाही कारण असं केलं तर मी त्यांना कमजोर दिसेन.” असं म्हणून शिव रडू लागतो.
दरम्यान ‘विकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खानने सर्वच सदस्यांना आरसा दाखवला आहे. एकीकडे अंकित आणि प्रियांकाच्या नात्यात दुरावा आला आहे. तर दुसरीकडे शालीन आणि टीना यांच्या नात्याचं सत्यही सलमान खानने सर्वांसमोर आणलं आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काय काय घडणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.