शिव ठाकरे(Shiv Thakare) हा रिअ‍ॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो. तो त्याच्या वागण्या-बोलण्याने आणि स्वभावाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतो. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला. बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वात तो उपविजेता ठरला. ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील तो फायनलिस्टपैकी एक होता. तसेच शिव ठाकरे हा काही म्युझिक व्हिडीओंमध्येदेखील दिसला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शिव ठाकरे प्रेक्षकांच्या संपर्कात असतो. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो व व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता शिव ठाकरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

शिव ठाकरेची ‘चल भावा सिटी’मध्ये एन्ट्री

शिव ठाकरे हा ‘चल भावा सिटीत’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘चल भावा सिटीत’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये शिव ठाकरे स्पर्धकांना टास्क देताना दिसत आहे. स्पर्धकांना वेगवेगळ्या जॉबच्या ठिकाणी जाऊन ते काम शिकायचं आहे. मात्र, यामध्ये ट्विस्ट असा आहे की, या स्पर्धकांना एकमेकांविरुद्ध हा टास्क खेळायचा आहे. त्यांना एका जोडीला चॅलेंज द्यायचे आहे.

शिव ठाकरे एका फळ्यावर कोणत्या जोड्यांमध्ये टास्क होणार, हे लिहित असल्याचे पाहायला मिळते. एकमेकांना चॅलेंज देताना या स्पर्धकांमध्ये वाद होत असल्याचेदेखील दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना, “शिव ठाकरे गेममध्ये भन्नाट ट्विस्ट आणणार, गावरान ब्रोज आता विरोधात खेळणार”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेकांनी शिव ठाकरेला पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे कमेंट करीत म्हटले आहे.

आता या टास्कमध्ये कोण कोणाला चॅलेंज देणार आणि कोण हा टास्क जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गावातील १२ मुले व शहरातील १३ मुली या शोमध्ये सहभागी झाल्या आहेत. मुलांना गावरान ब्रोज तर मुलींना सिटी सुंदरी असे म्हटले जात आहे. यामध्ये दर आठवड्याला जे टास्क उत्तम पार पाडतील त्यांना खेळात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे, तर जे टास्क खेळण्यात कमी पडतील त्यांना शोमधून बाहेर पडावे लागणार, असे या खेळाचे स्वरूप आहे. आता या खेळात शेवटपर्यंत कोण टिकणार आणि हा शो जिंकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे सांभाळताना दिसत आहे. या शोमध्ये स्पर्धकांना विविध टास्क दिले जातात. अनेकदा हे टास्क पूर्ण करताना त्यांची धांदल उडताना दिसते. त्यादरम्यान काही गमतीजमतीदेखील घडताना दिसतात. आता या शोमध्ये पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.