टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसचं १६ पर्व आता संपलं आहे. रविवारी रात्री या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. पण त्यात शिव ठाकरेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अखेरच्या क्षणी हार झाल्यानंतर काय वाटलं हे शिव ठाकरेने सांगितलं आहे.
बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकल्यानंतर शिव ठाकरे आता बिग बॉस १६चं विजेतेपद जिंकेल अशी आशा सर्वांनाच वाटत होती. मात्र असं झालं नाही. अखेरच्या क्षणी एमसी स्टॅनला विजेता घोषित करण्यात आलं आणि शिव ठाकरे रनरअप ठरला. त्यानंतर सोशल मीडियावरून शिवच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आणखी वाचा- “नेहमीच खरं वागलो…”, Bigg Boss 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली पोस्ट
शिव ठाकरे म्हणाला, “जे व्हायचं होतं ते झालं आणि ट्रॉफी माझ्या मंडलीमध्ये गेली आहे. माझा मित्र एमसी स्टॅनच्या हातात आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. मी अखेरच्या दिवसापर्यंत विजेतेपदाच्या शर्यतीत होतो. जे मी मनापासून केलं त्याचं फळ मला मिळालं आहे. लोकांनी माझं कौतुक केलं. आज अनेक लोक मला ओळखतात. ज्यासाठी मी बिग बॉसच्या घरात गेलो होतो ती गोष्ट मला मिळाली आहे.”
आणखी वाचा- Bigg Boss 16 जिंकल्यावर एमसी स्टॅनची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या शिव ठाकरेचा उल्लेख करत म्हणाला…
तो पुढे म्हणाला, “आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करतो पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. जेणेकरून तुमच्यातली पुढे जाण्याची भूक कमी होऊ नये आणि आता माझी ही भूक जास्त वाढली आहे. पुढे दरवाजा उघडेल मी आणखी शो करेन आणि सर्वकाही प्रामाणिकपणे करेन. जे लोक मला भेटलेत ते खुश आहेत. अशा करतो की मी त्यांच्यासाठी उभा राहीन जे आज माझ्यासाठी उभे आहेत. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मी त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरुपाची मदत करेन.”