‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले नुकताच संपन्न झाला.अखेरीस शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत होती. अखेर यात पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलं. विजेतेपद स्टॅनला मिळालं असलं तरीही सगळीकडे चर्चा शिव ठाकरेची होत आहे. आता नुकताच तो त्याच्या गावी अमरावतीला परतला. तिथे त्याचं दणक्यात स्वागत करण्यात आलं.
‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरे पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. या घरातील त्याच्या वागणुकीचं त्याच्या खेळाचं सर्वांनी कौतुक केलं. त्यामुळे बिग बॉस १६ ची ट्रॉफी शिवने जिंकावी अशी सर्वांची इच्छा होती. पण तसं झालं नाही. ‘बिग बॉस १६’ची ट्रॉफी जरी शिवला मिळाली नसली तरीही त्याने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”
शिव ठाकरे अमरावतीला पोहोचताच नागरिकांनी तेथील रस्ते अडवले होते. लोकांनी फटाके उडवत, ढोल-ताशे वाजवत शिवचं स्वागत केलं. तर काहींनी शिवला हारही घातला. शिव ठाकरे त्याच्या गाडीच्या सनरूफमध्ये उभा राहून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करत होता. कोणी शिवचे फोटो काढत होतं, कोणी त्याला हात मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतं, तर कोणी त्याला जोरजोरात हाका मारत होतं. अमरावतीकरांकडून मिळालेलं हे प्रेम पाहून शिवही भारावून गेला.
हेही वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?
आता त्याचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. यावर प्रतिक्रिया देत अनेकांनी शिव ठाकरेच त्यांच्यासाठी विजेता आहे असं म्हटलं. दरम्यान ‘बिग बॉस १६’ नंतर शिव ठाकरेला सलमान खानच्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे असं समोर आलं होतं. त्यामुळे त्याला आता सलमान बरोबर स्क्रीन शेअर करताना बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.