मराठमोळ्या शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘बिग बॉस १६’मध्ये सहभागी होऊन त्याने त्याची छाप सर्वांवर पाडली. ‘बिग बॉस १६’ संपताच शिवकडे नवीन प्रोजेक्टच्या ऑफर्सची रांग लागली आहे. रोहित शेट्टीने त्याला ‘खतरों के खिलाडी’ कार्यक्रमाची ऑफर दिली आणि लवकरच तो ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी पर्वामध्ये दिसणार आहे. इतकंच नाही तर यादरम्यान शिवने २ बड्या मराठी चित्रपटांना नकार दिला आहे असा खुलासा त्याने एका मुलाखतीत केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिव ठाकरे सध्या ‘खतरो के खिलाडी’च्या या आगामी सीझनसाठी तयारी करताना दिसत आहे. तसंच या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्याला प्रत्येक एपिसोडसाठी ५ ते ६ लाख मानधन मिळणार असल्याचंही नुकतंच समोर आलं होतं. या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्याला २ बिग बजेट मराठी चित्रपटांना नकार द्यावा लागला.

आणखी वाचा : शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक? एका एपिसोडसाठी मिळणार ‘इतकी’ रक्कम

नुकतीच ‘हिंदुस्तान टाइम्स’ला एक मुलाखत दिली. यावेळी त्याने सांगितलं, “मला मराठी चित्रपटाची ऑफर मिळाली होती. खरं तर मला दोन मोठ्या मराठी चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली होती. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन मराठीतील नावाजलेले दिग्दर्शक करणार होते. पण त्या दोन्ही चित्रपटांचं शूटिंग एप्रिलमध्ये सुरू होऊन मे महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार होतं. मी आधीच ‘खतरों के खिलाडी’ला होकार दिल्यामुळे माझ्या तारखा या चित्रपटांच्या शेड्युलशी जुळत नव्हत्या. तसंच माझं मन ‘खतरों के खिलाडी’मध्येच गुंतलं होतं सांगत होतं. त्यामुळे मी या चित्रपटांना नकार दिला.”

हेही वाचा : ‘बिग बॉस १६’नंतर शिव ठाकरे झळकणार मराठी चित्रपटात?, म्हणाला, “मी पाहिलेलं स्वप्न लवकरच…”

“मी जर कॅमेऱ्यासमोर उत्स्फूर्तपणे अभिनय करू शकलो तरच मी प्रेक्षकांशी कनेक्ट होईन. सध्या मी माझ्या बोलण्याची पद्धत आणि इतर काही गोष्टींवर काम करत आहे,” असंही शिवने या मुलाखतीमध्ये सांगितलं. त्यामुळे ‘खतरों के खिलाडी’ संपल्यानंतर तरी तो मराठी चित्रपटामध्ये झळकणार का, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv thakare rejected 2 big budget marathi films offers for khatron ke khiladi rnv