Celebrity MasterChef : ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम सध्या खूप चर्चेत असतो. या कार्यक्रमाला हवा तसा टीआरपी मिळत नसला तरी सोशल मीडियावर याची कायम चर्चा रंगलेली असते. या कार्यक्रमातील व्हिडीओ खूप व्हायरल होतं असतात. नुकतंच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ला दीपिका कक्करने रामराम केला. त्यामुळे आता तिच्या जागी कोण दिसणार? असा प्रश्न उपस्थित होतं आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्याला दीपिकाच्या जागी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.

चार वर्षांनंतर टेलिव्हिजनवर पदार्पण करणाऱ्या दीपिका कक्करने होळी स्पेशल भागात ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडत असल्याचा निर्णय जाहीर केला. दीपिकाच्या हाताची दुखापत वाढल्यामुळे तिने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून काढता पाय घेतला आहे. तिच्या डाव्या खांद्याचा त्रास वाढल्यामुळे पाठीत वेदना होतं आहे. त्यामुळे दीपिका जेवण बनवू शकत नाही. म्हणूनच तिने ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तिचा हा निर्णय ऐकून मास्टरशेफमधील स्पर्धकांसह परीक्षकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

‘इंडिया फोरम’च्या माहितीनुसार, दीपिका कक्करच्या एक्झिटनंतर निर्मात्यांनी ‘बिग बॉस मराठी’चा दुसऱ्या पर्वाचा विजेता, लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरेला विचारणा केली आहे. त्यामुळे दीपिकाची जागा शिव घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये शिव ठाकरेची वाइल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकते. पण, अजूनही याबाबत अधिकृतरित्या घोषणा झालेली नाही.

शिव ठाकरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधून तो घराघरात पोहोचला. ‘रोडिज’, ‘बिग बॉस मराठी २’, हिंदी ‘बिग बॉस १६’, ‘खतरों के खिलाडी १३’, ‘झलक दिखला जा ११’ या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमुळे शिव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. त्यानं इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवची ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये वाइल्ड एन्ट्री होते की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये एकूण १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्वात आधी चंदन प्रभाकर एविक्ट झाला. त्यानंतर अभिजीत सावंत बाहेर झाला आणि आता दीपिकाने कार्यक्रम सोडला. आता या कार्यक्रमात निक्की तांबोळी, गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश, राजीव अडातिया, अर्चना गौतम, उषा नाडकर्णी, फैजल शेख राहिले आहेत.