‘बिग बॉस’ हिंदीच हे १६वं पर्व सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच हे पर्व यंदाच्या स्पर्धकांमुळे चर्चेत आलं होतं. हे पर्व संपायला शेवटचे काही दिवस उरले आहेत. आता आज या पर्वाचा ग्रँड फिनाले होणार आहे. यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं दिसत आहे. अशातच ग्रँड फिनालेपूर्वी शिव ठाकरेच्या अकाउंटवरून केली गेलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
यंदाच्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे व्हावा असंच सगळ्यांना वाटतं. प्रेक्षकांच्या वोटिंगनुसार त्याचं नाव या पर्वातील टॉप ३ स्पर्धकांमध्ये सामील आहे. तो या पर्वात सहभागी झाल्यापासूनच त्याची टीम सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांचे शेअर करत आहे. आता आज रंगणाऱ्या ग्रँड फिनालेपूर्वी त्यांनी शिवचा या कार्यक्रमातील प्रवास एका व्हिडीओच्या माध्यमातून नेटकऱ्यांसमोर आणला आहे. या व्हिडीओसोबतच त्यांनी एक खास कॅप्शनही लिहिलं आहे.
एका व्हिडीओच्या माध्यमातून शिव चा बिग बॉस १६ च्या घरातील प्रवास शेअर करत त्याच्या टीमने लिहिलं, “शिव हा खेळ फक्त खेळला नाहीये तर त्याच्या खऱ्या भावना, त्याचा स्वभाव, त्याची मैत्री, त्याच्यातील नेतृत्वगुण, त्यातला खरेपणा दाखवत तो हा खेळ जगला आहे. या कार्यक्रमातील त्याचा प्रवास एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही. शिवने ते सगळं केलं आहे जे एखाद्या सुपरहिट चित्रपटांमध्ये असतं. आता जेव्हा जेव्हा जेव्हा ‘बिग बॉस १६’चं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा शिव मनोहरराव उत्तमराव झिंगुजी गणूजी ठाकरे हे नावही घेतलं जाईल.” आता ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत शिवचे चाहते त्याच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करत आहेत.
आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?
दरम्यान आज ‘बिग बॉस 16’चा ग्रँड फिनाले शिव ठाकरे, अर्चना गौतम, स्टॅन, शालीन आणि प्रियांका चौधरी या चार जणांमध्ये रंगणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस १६’च्या ट्रॉफीची पहिली झलक दाखवण्यात आली. यावेळी ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीमध्ये एक युनिकॉर्न बनवण्यात आला आहे, जो चांदी आणि सोनेरी रंगाचा आहे. ही ट्रॉफी कोणाच्या हातात जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.