Valentine’s Day 2025: दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी प्रियकर-प्रेयसी आणि पती-पत्नी एकमेकांवरील प्रेम जाहीर करतात. तसंच या दिवशी जोडीदारासाठी गिफ्ट्स, डेट असं बरंच काही केलं जात. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने हा प्रेमाचा दिवस एका खास व्यक्तीबरोबर साजरा केला आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘रोडिज’ या लोकप्रिय कार्यक्रमातून करिअरची सुरुवात करणारा शिव ठाकरे नेहमी चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर शिव हिंदी ‘बिग बॉस १६’, ‘खतरों के खिलाडी १३’, ‘झलक दिखला जा सीझन ११’ या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे त्याची अधिक लोकप्रियता वाढली, तो देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. अशा या प्रसिद्ध शिव ठाकरे व्हॅलेंटाइन डे ज्या खास व्यक्तीबरोबर साजरा केला, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून त्याची आजी आहे.
शिवने आजीबरोबर व्हॅलेंटाइन डे साजरा करतानाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘डे विथ माय व्हॅलेंटाइन आजी’ असं कॅप्शन लिहित अनोख्या अंदाजात व्हॅलेंटाइन साजरा केला आहे. शिवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
या व्हिडीओमध्ये सुरुवातीला शिव आजीला गाडीतून उतरवताना दिसत आहे. त्यानंतर आजीला खास सरप्राइज देताना शिव पाहायला मिळत आहे. मग गुलाबांच्या पाकळ्यांचं हार्ट करून शिव आजीला देताना दिसत आहे. नंतर चहा अन् मजा, मस्ती शिव आणि आजीची पाहायला मिळत आहे. या सुंदर व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिव ठाकरेच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “आजी सर्वात नशीबवान आहे.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, सर्वात्कृष्ट व्हॅलेंटाइन आहे. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “आयुष्य जिंकलास.” शिव आणि आजीच्या या सुंदर व्हिडीओला आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.