टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ हिंदीचे १६ वे पर्व संपले आहे, पण अजूनही या पर्वाची आणि त्यातील स्पर्धकांची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. रॅपर एमसी स्टॅनने यंदाचं पर्व जिंकलं, पण विजेत्यापेक्षाही चर्चा झाली ती मराठमोळ्या शिव ठाकरेची. शिव ठाकरेच जिंकेल, असं वाटत होतं, पण एमसीने विजेतेपद पटकावलं.
शोमधून बाहेर पडल्यानंतर शिव ठाकरेने अनेक खुलासे केले आहेत. एमसी स्टॅनपासून ते अर्चना गौतमपर्यंत सगळ्यांबद्दल तो बोलला आहे. शिवने अलीकडेच शेखर सुमन यांच्याबद्दल गौप्यस्फोट केला आहे. दर रविवारी शेखर सुमन बिग बॉस १६ च्या मंचावर यायचे. ते घरातील सर्व सदस्यांना त्यांच्या खास शैलीत ट्रोल करायचे. शेखर सुमन त्यांना दर रविवारी त्यांच्या चुका आणि आठवड्याभरातील कामावरून बोलायचे.
ई टाइम्सशी बोलताना शिव ठाकरे म्हणाला, “शेखर सरांच्या बोलण्याने मला खूप दुःख व्हायचं. त्यामुळे मी अनेकदा भावूक झालो होतो. मी त्यांच्या बोलण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करायचो, पण जेव्हा हे माझ्याबरोबर सातत्याने घडू लागलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मला कळतं की त्यांचे आवडते स्पर्धक आहेत आणि त्यांनी त्यांचं कौतुक करण्यात काहीही चुकीचं नाही. पण, त्यांच्या बोलण्यामुळे मी चांगली व्यक्ती नाही, असं मला वाटू लागलं होतं.”
“मला वाटतं की शेखर सुमन प्रियंका, अर्चना आणि अंकितचं कौतुक करायचे. मला यात काही अडचण नाही. दर रविवारी बोलणी खावी लागायची, त्यामुळे मला वाईट वाटायचं,” असं शिव म्हणाला. याबाबत सुमन शेखरशी बोलल्यावर ते चॅनेलकडून मिळणाऱ्या स्क्रिप्ट फॉलो करायचे, असं त्यांनी सांगितलं.