कलाकार व चाहत्यांचे नाते हे कायमच स्पेशल असल्याचे पाहायला मिळते. कलाकारांच्या कलाकृतीला दाद देण्यासाठी प्रेक्षक अनेकविध गोष्टी करताना दिसतात. अनेक कलाकार चाहत्यांनी त्यांना पत्रे लिहिल्याची आठवण सांगत असतात. एखाद्या कलाकृतीमुळे प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होत असेल, तर कलाकारांप्रति ते कृतज्ञता व्यक्त करतानाही दिसतात. आपल्या आवडत्या कलाकारांना भेटणे, त्यांच्यासाठी खास भेटवस्तू घेऊन जाणे, अशा अनेक गोष्टी चाहते करताना दिसतात. चाहत्यांचे हे प्रेम कलाकारांसाठी त्यांच्या कामाची पावती असते. त्यामुळे अनेकदा हे कलाकार चाहत्यांच्या नि:स्वार्थी प्रेमाने भारावून जातात. आता झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शिवा’ (Shiva) मालिकेतील अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली…
अभिनेत्री पूर्वा कौशिकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या भूमिकेच्या म्हणजेच शिवाच्या वेशभूषेत दिसत आहे. तिच्याबरोबर तिची एक चाहती दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पूर्वा म्हणते, “आज आमच्या ‘शिवा’च्या सेटवर एक गोड व्यक्ती आली आहे. ती शिवाची चाहती आहे. तिचं नाव वृषाली आहे. तिला शिवा खूप आवडते, असं तिचं म्हणणं आहे. आणि ती उत्तम गाणं गाते. त्यानंतर पूर्वा तिला विचारते की, आज तू कोणतं गाणं गाणार आहेस? त्यावर वृषाली आज मी, ‘आपकी नजरों ने समजा’ हे गाणं गाणार आहे, असे सांगते. त्यानंतर तिने गोड आवाजात ‘आप की नजरों ने समजा’ हे गाणे गायल्याचे दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना शिवाने त्यावर लिहिले, “आज शिवाच्या सेटवर मी या खूप क्यूट चाहतीला भेटली. तिची भेट मनाला स्पर्शून गेली. शिवा आज खऱ्या अर्थानं जिंकली, असं वाटलं. मी भारावून गेले”, असे लिहित पूर्वाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवा ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका असल्याचे पाहायला मिळते. शिवाचा हटके लूक, तिचा धाडसीपणा, कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी तिची तत्परता, आशूवरचे प्रेम, भाऊंप्रति असणारा आदर, आजीबरोबर असलेली मैत्री, तिची पाना गँग अशा सर्व गोष्टींमुळे शिवा सर्वांपेक्षा वेगळी ठरते. तिचे हे वेगळेपण लोकांना भुरळ घालते. त्यामुळे शिवाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळताना दिसते.
दरम्यान, सध्या मालिकेत शिवा तिच्या जून्या लूकमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आशूने तिला घराबाहेर जायला सांगितल्यावर ती तिच्या माहेरी परत आली आहे. आशूच्या मनात तिच्याविषयी अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज शिवाची बहीण दिव्या व आशूची बहीण कीर्ती या दोघींनी निर्माण केले आहेत. आता आशूच्या मनातील तिच्याविषयीचे गैरसमज शिवा कशी दूर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.