‘शिवा'(Shiva) ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली आहे. या मालिकेत आशू ही प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता शाल्व किंजवडेकर (Shalva Kinjawadekar) घराघरांत पोहोचला आहे. मालिकेबरोबरच अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत आहे. शाल्वचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले आहे. श्रेया डफळापूरकर असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. सहा वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. आता मात्र अभिनेत्याने एका मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.
शाल्व किंजवडेकरचे वक्तव्य चर्चेत
शाल्व किंजवडेकर व श्रेया डफळापूरकर यांनी नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत शाल्व व श्रेया यांनी त्यांच्या नात्याबद्दल, लग्नानंतर काय बदल झाले, याबरोबरच त्यांची ओळख कशी झाली होती, यावर वक्तव्य केले. या सगळ्यात शाल्वने या मुलाखतीत केलेले वक्तव्य चर्चेत आहे. या मुलाखतीत श्रेयाला विचारले की, शाल्वचे आई-वडील तुझे मित्र आहेत का? यावर बोलताना श्रेयाने म्हटले की, जेव्हा मला पाठिंब्याची किंवा आधाराची गरज असते व ते माझ्यासोबत असतात ते माझे मित्र बनतात. नंतर ते आई-वडील आहेत. ते दोन्ही भूमिका सांभाळून घेतात.
माझी सासू माझी खूप जवळची मैत्रीण आहे. दिवसातून एकदा बोलणं झाल्याशिवाय आमचा दिवसच जात नाही. जर मला काही माहीत असेल तर ते तिला माहीत असतंच. जर मला कोणी काही सांगत असेल तर ते माझ्या सासूला माहीतच असते. मी तिला ते सांगतेच. श्रेयाच्या या बोलण्यावर शाल्वने म्हटले की, मलाही कधीकधी ईर्ष्या वाटते. या दोघींचं काय चाललंय, या काय बोलतात किंवा चर्चा करत आहेत, असं मला कधी कधी वाटतं. पुढे श्रेयाने म्हटले की, माझी सासू खूप गोड व्यक्ती आहे. असे म्हणत श्रेयाने तिच्या सासूचे कौतुक केले आहे.
दरम्यान, शाल्व सध्या ‘शिवा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. त्याने आशू ही भूमिका साकारली आहे, तर शिवाच्या भूमिकेत पूर्वा कौशिक दिसत आहे. दोन्ही कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांची मने जिंकली आहेत. या मालिकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले होते. याबरोबरच प्रेक्षकांचेसुद्धा आभार मानल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले. आता मालिकेत नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत.