‘शिवा'(Shiva) मालिकेत सतत काही ना काही नवीन गोष्टी घडताना पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच आशूने शिवाला घराबाहेर काढले असून, सध्या ती तिच्या माहेरी राहत असल्याचे दिसत आहे. आशूची बहीण कीर्ती व शिवाची बहीण दिव्या या दोघींनी एकत्र येत एक प्लॅन बनवला. आशू व शिवाला एकमेकांपासून दूर करण्यासाठी त्या एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोघींनी आशू व शिवामध्ये मोठे गैरसमज निर्माण केले. त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. या जोडप्यामध्ये दुरावा निर्माण झाला. आता पाना गँगने आशू-शिवाला एकत्र आणण्यासाठी एक प्लॅन बनवला असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आशू-शिवामधील गैरसमज दूर होणार का?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, शिवाचे मित्र तिला तिच्या घरातून बोलावून नेतात. दुसरीकडे आशूचा मित्रदेखील त्याला त्याच्या घरातून बाहेर घेऊन जातो. आशू व शिवाला ते समोरासमोर आणतात आणि त्यांना ऑल द बेस्ट म्हणत तिथून निघून जातात. शिवा व आशू दोघेच तिथे राहतात. आशू शिवाला म्हणतो, “काय राहिलंय बोलायचं?”, आशूच्या या बोलण्यावर शिवा त्याला म्हणते, “पण मला बोलायचं आहे.” तितक्यात पाना गँग तिथली लाइट घालवते. लाइट गेल्यावर आशू वैतागून म्हणतो, आता हे काय? शिवा त्याला समजावत म्हणते की, तू अंधारात इकडे-तिकडे चालू नको. आशू तिला म्हणतो की, मी आता अंधाराला घाबरत नाही. असे म्हणत तो पुढे जातो आणि खुर्चीला धडकतो. त्याच्या पायाला खुर्ची लागते. त्यानंतर “मी तुला सांगितलेलं की, इकडे-तिकडे जाऊ नको. उगाच नखरे करतोयस,” असे म्हणत शिवा आशूच्या पायाला औषध लावते. ते एका ठिकाणी बसलेले असतात, तितक्यात खुर्ची पडते आणि आशू घाबरतो. हे पाहिल्यानंतर शिवा गालातल्या गालात हसताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आशू आणि शिवामध्ये शांतपणे बोलणं होऊ शकेल…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, आशू व शिवा यांच्यात गैरसमज निर्माण झाले असून, त्यांनी वेगळे व्हावे, अशी सिताईची इच्छा आहे. सुरुवातीला आशू व शिवा एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यानंतर शिवा आशूच्या प्रेमात पडली. त्यावेळी शिवाची बहीण दिव्या व आशूचे लग्न ठरले होते. मात्र, दिव्या पैशाच्या आमिषाने तिचा बॉयफ्रेंड चंदनबरोबर लग्नातून पळून गेली. त्यामुळे आशूच्या वडिलांनी शिवा व आशू यांचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही दिवसांनी चंदनने फसवले असून, त्याच्याकडे पैसे नाहीत, असे दिव्याला समजले. त्यामुळे ती त्याच्याशी भांडण करून माहेरी आली आहे. त्यानंतर तिने आशू व शिवा यांच्यामध्ये गैरसमज निर्माण केले आहेत.
हेही वाचा: Bigg Boss 18: चुम दरांग झाली नवी ‘टाइम गॉड’, घरात झाला राडा; करणवीर मेहरा-रजत दलालमध्ये जोरदार भांडण
आता आशू व शिवा यांच्यातील अंतर कमी होणार का, त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यात त्यांच्या मित्रांना यश मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.