मालिकांमध्ये सतत येणाऱ्या ट्विस्टमुळे कथा कोणते नवे वळण घेणार, मालिकेत पुढे काय घडणार , याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असते. ‘शिवा'(Shiva) मालिकेत गेल्या काही दिवसांपासून वेगळे वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवा व आशू यांच्यामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाल्याचे दिसत आहे. या गैरसमजूतीतूनच आशूने शिवाला घराबाहेर जाण्यास सांगितले. शिवा सध्या तिच्या माहेरी आली आहे. महत्वाचे म्हणजे सध्या ती तिच्या पहिल्या स्टाईलमध्ये दिसत आहे. दुसरीकडे सिताई व किर्ती आशूचे दुसरे लग्न व्हावे, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. शिवा व आशू जेव्हा समोरासमोर आले तेव्हा, शिवाने त्याला तू लग्नाला होकार दे असे सांगितले होते. आता मात्र, शिवावर संकट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोच्या सुरूवातीला रामभाऊ व आशू यांच्यात संवाद सुरू आहे. रामभाऊ आशूला विचारतात की तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू हा निर्णय का घेतलास? प्रोमो पुढे पाहायला मिळते की शिवा तिच्या वडिलांच्या फोटोबरोबर बोलत आहे. ती म्हणते, “आतापर्यंत प्रेमामुळेच मी सगळे निर्णय घेतले आणि त्याचं माझ्यावर असलेलं प्रेम कबुल केलं नसलं ना तरी मला त्याच्या डोळ्यात दिसलंय आणि मला ते कबूल करून घ्यायचंय.” या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की नेहा आशूला समजावते, “तू ना विचार करून निर्णय घे. कारण, या निर्णयामुळे तुझ्या-माझ्या आयुष्याचा मार्ग तर ठरणारच आहे. पण, आपल्या कुटुंबाचंदेखील ठरणार आहे. तर आशू नेहाला म्हणतो, “माझा होकार आहे”, त्याचे हे उत्तर ऐकून नेहाला मात्र धक्का बसल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आशू लग्नासाठी होकार देऊन शिवाचा प्रेमावरील विश्वास खोटा ठरवणार का ?”, अशी कॅप्शन दिली आहे.
हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे मत व्यक्त केले आहे. या कमेंट्स संमिश्र असल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “शिवाचं प्रेम जिंकणार. आता तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तिने पडती बाजू घ्यायलाच नको आहे. यांचे खूप नाटकं झाले. आता त्यांनी तिची माफी मागून प्रेम कबुलच करायला हवं”, “शिवाचा प्रेमावर खरा विश्वास आहे, मला तिचा आत्मविश्वास आवडतो”, “सत्य राहीले बाजुला निव्वळ लग्नाचा बाजार मांडलाय”, अशा कमेंट केल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, नेहाने शिवाच्या सांगण्यावरून आशूबरोबरच्या लग्नाला होकार दिला आहे. तिला तिच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. आता मालिकेत काय होणार, शिवा-आशूमधील गैरसमज दूर होणार की ते कायमचे वेगळे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.