‘शिवा'(Shiva) या मालिकेने आता रंजक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहे. शिवा-आशूचे भांडण असो किंवा त्यांच्यातील केमिस्ट्री, प्रेक्षकांना ही मालिका मोठ्या प्रमाणात आवडत असल्याचे दिसते. कीर्ती व दिव्याने शिवा-आशूला कितीही एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचा संपूर्ण प्लॅन फसला आणि अखेरीस ते दोघे एकत्र आले. शिवासाठी आशूने घर सोडले आहे. आता तो स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी धडपडत आहे. आईच्या विरोधात जाऊन त्याने स्वत:साठी एक साधी जीवनपद्धती निवडली आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो प्रयत्न करीत असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
आशू या मुलीनं तुला…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सिताई आशूकडे आली आहे. सिताई आशूला म्हणते, “आशू या मुलीनं तुला माझ्यापासून लांब केलं आहे.” त्यावर आशू म्हणतो, “आई, तुझ्या हट्टानं मला तुझ्यापासून लांब केलं आहे. सिताई त्याला म्हणते, “तू हट्ट सोड आणि घरी चल.” आशू म्हणतो “मी शिवाशिवाय कुठेही जाणार नाही.”
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आशू नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर जात आहे. त्यावेळी शिवा त्याच्या खिशात काही पैसे ठेवते. आशू तिला हे कशासाठी ,असे विचारते. तेव्हा ती म्हणते, आता आपण एकत्र आहोत आणि एकत्र एकमेकांना पाठिंबा देतोय. सगळे व्यवस्थित होईल. फक्त तू जे करशील, ते मनापासून कर. यादरम्यान, आशू बसने प्रवास करीत नोकरी शोधण्यासाठी गेला असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना, स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी ठरेल का आशू? अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, कीर्ती व दिव्याने एकत्र येत आशू व शिवाला वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दिव्याच्या पतीने वेळीच त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आशूने सर्वांसमोर शिवावरचे प्रेम व्यक्त केले. सिताईने मात्र शिवाला तिची सून मानण्यास नकार दिला. त्यामुळे आशूने शिवाबरोबर वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. आशू-शिवा या दोघांनी त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.