शिवा(Shiva) व सिताई ची जोडी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ मालिकेत सध्या रंजक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. सिताईने शिवाचा सून म्हणून स्वीकार केला आहे. याबरोबरच शिवा जशी राहते, तसेच तिला एक व्यक्ती म्हणून स्वीकारले आहे. इतकेच नाही तर तिने तिची ओळख जपावी, तिला आवडेल तसे राहावे असे म्हणत सिताईने शिवाला आश्वस्त केले. याबरोबरच सिताईने शिवाचे जग पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शिवाने तिचं जग पाहण्यासाठी वस्तीत यावं लागेल असं सांगितलं. मात्र, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला, जेव्हा सिताईने शिवाच्या वस्तीत जाण्यापूर्वी शिवासारखाच लूक केला. तसाच शर्ट, गॉगल आणि स्टाईल करून सिताई शिवाचं जग पाहण्यासाठी तयार झाली. आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून सिताई शिवाचा लोकप्रिय ठरलेला डायलॉग म्हणताना दिसत आहे. तसेच, सासू-सुना मिळून धमाल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, शिवा व सिताई या शिवाच्या माहेरी आल्या आहेत. सिताई बाई आजी व शिवाच्या आईला सांगते की सगळं छान होणार आहे. आता इथून पुढे शिवाचं जे अस्तित्व आहे, जसं आहे तसंच देसाईंच्या घरात जिवंत राहणार आहे.” हे ऐकल्यानंतर बाई आजी व शिवाच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, तर दिव्याला राग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर शिवा व सिताई गाडीवर बसल्या असून सिताई शिट्टी वाजवताना दिसत आहे. तसेच सिताई गाडी चालवायला शिकणार असल्याचेही प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

सिताईंचा मोठा निर्णय

याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सिताई शिवाचा गाजलेला डायलॉग म्हणत आहे. सिताई म्हणते, “केसाला धक्का तर कपाळाला बुक्का”, पुढे शिवा म्हणते, “शिवा दिलेला शब्द मोडत नाही, ठेवलेला विश्वास तोडत नाही”; त्याचवेळी सिताई तिच्या हातात हात देत म्हणते, “धरलेला हात…”, शिवा म्हणते, “सोडत नाही.” शिवा ज्या गोष्टी करते, ज्या गोष्टींमुळे तिची वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्या गोष्टी सिताई तिच्याकडून शिकत असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “शिवाचं अस्तित्व देसाईंच्या घरात अबाधित राहणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सिताईला शिवा ही आशूची बायको म्हणून किंवा देसाई कुटुंबाची सून म्हणून कधीच आवडली नाही, त्यामुळे सुरुवातीपासून सिताईने शिवाला सून मानण्यास नकार दिला. शिवाची राहण्याची पद्धत, तिच्या कपड्यांची स्टाइल, छोटे केस तसेच बोलण्याची स्टाइल सिताईला कधीच आवडली नाही. ती गुंडांबरोबर मारामारी करते, हेही सिताईला पटत नव्हते. तिने अनेकदा स्वत:ला बदलावे असा सल्ला सिताईने दिला. कीर्तीचे ऐकून शिवाला आशूपासून दूर करण्याचा प्रयत्नही केला. आता मात्र, सिताईला शिवाची जगण्याची पद्धत वेगळी असली तरी ती व्यक्ती म्हणून चांगली आहे, याची जाणीव झाली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.