शिवा (Shiva) हे पात्र आपल्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या शिवा या मालिकेत नवीन वळण येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या शिवाच्या आयुष्यात चढ-उतार येताना दिसत आहेत. सतत तिला कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या कुटुंबासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, तिचा पती आशू व सासू हे कायम तिच्यावर अविश्वास दाखवीत असल्याचे दिसते. आता शिवा व आशू हे कायमचे एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
अखेर शिवा व आशू एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एका प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आशूची आई म्हणजेच सिताई शिवाला घटस्फोटाचे पेपर देत म्हणते, “हे तुझे व शिवाचे डिव्होर्स पेपर. तू या पेपर्सवर सह्या कर आणि या नात्यातून मोकळा हो बाळा”, सिताईने असे म्हटल्यानंतर दिव्याने शिवाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या त्याला आठवतात. त्या सर्व खऱ्या आहेत, असे तो समजतो. आशू घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करतो. या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सिताई व कीर्ती शिवाच्या घरी जातात. शिवा व तिच्या संपूर्ण कुटुंबाला सिताई म्हणते, “आशूने या डिव्होर्स पेपरवर सह्या केल्यात. त्यामुळे तू आता मान्य कर की, या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच होता”, असे म्हणून सिताई शिवाच्या घरातून निघून जाते. मात्र, शिवा व तिच्या कुटुंबाला याचा मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “खरंच शिवा आणि आशू कायदेशीररीत्या वेगळे होतील का…?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे सुरुवातीला दिव्या व आशूचे लग्न ठरले होते. मात्र, दिव्याचा बॉयफ्रेंड चंदनने तिला पैशाचे आमिष दाखवले आणि दिव्या ऐन लग्नातून चंदनबरोबर पळून गेली. तिच्या जागी तिची लहान बहीण शिवाने आशूबरोबर लग्न केले. याआधी आशू व शिवा एकमेकांचे चांगले मित्र होते. लग्नानंतर शिवाने तिच्या स्वभावाने घरातील सर्वांची मने जिंकून घेतली. मात्र, तिची सासू, नणंद यांना हे लग्न मान्य नव्हते. त्या सतत त्यांचे लग्न मोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत होते. दुसरीकडे दिव्याने चंदन श्रीमंत आहे म्हणून त्याच्याबरोबर पळून जात लग्न केले. मात्र, लग्नानंतर तिला समजले की, चंदन तिच्याशी खोटे वागला. आता दिव्याला आशूच्या आयुष्यात परत जायचे आहे. त्यामुळे शिवा व आशूमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी तिने त्याला शिवाबद्दल खोटे सांगितले. आशूनेदेखील त्यावर विश्वास ठेवला. आशूची बहीण कीर्ती व शिवाची बहीण दिव्या यांनी एकत्र येत, आशू व शिवाला दूर करण्याचा प्लॅन बनवला आणि आता तो यशस्वी होताना दिसत आहे.
आता शिवा पुढे काय करणार, ती सहजासहजी हार मानणार की हे सर्व कीर्ती व दिव्याने घडवून आणले हे सगळ्यांसमोर आणणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.