मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे प्रेक्षक पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी कायम उत्सुक असतात. प्रेक्षकांची लाडक्या झालेल्या ‘शिवा'(Shiva) या मालिकेत सध्या सतत नवनवीन वळणे समोर येताना दिसत आहेत. शिवाच्या आयुष्यात मोठे चढ-उतार येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आशू व शिवामध्ये मोठे गैरसमज झाले आहेत. आशूची बहीण कीर्ती व शिवाची बहीण दिव्या यांनी हे सगळे गैरसमज घडवून आणले आहेत. शिवा खोटे वागते, ती नाटक करते, असे आशूला वाटते. आता दोघांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीत सिताई व कीर्तीने हट्टाने आशूचे दुसरे लग्न नेहाबरोबर ठरवले आहे. आता शिवा मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये दिव्याचा नवरा चंदन शिवाचा संसार वाचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवा तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय…
शिवा या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये दिव्या व कीर्ती यांना चंदन एकत्र पाहतो. त्यांच्यात बोलणे चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. कीर्ती दिव्याला म्हणते की, तू जे काम केलं आहेस ना, त्या ठिणगीचा वणवा पेटला आहे. त्यांचे हे बोलणे ऐकण्याचा चंदन प्रयत्न करत आहे. याच प्रोमोमध्ये चंदन व शिवा एकत्र आहेत. चंदन शिवाला म्हणतो, “शिवा तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय, त्यामागे दिव्याचा हात आहे, असं मला वाटतं”, त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर शिवा त्याला म्हणते, “चंदन, अरे काहीही काय बोलतोस? दिव्या असं पैशासाठी काहीही करणार नाही. ती माझी बहीण आहे.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, चंदनने वेश बदलला आहे. तो वेटरच्या रूपात आशूच्या घरात शिरला आहे. कीर्तीच्या खोलीत तो काहीतरी शोधत आहे. तितक्यात कीर्ती रूममध्ये येते. ती आल्यानंतर चंदन लपतो. त्यानंतर त्याच्या हाती एक कागद लागला आहे, जो पाहून त्याला धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान, तो म्हणतो, “माझं तर माहीत नाही; पण तुझा संसार तरी मी तुटू देणार नाही. मी पुरावा दाखवला, तरच तुला पटेल की तुझी बहीण काय आहे ते.”
हा प्रोमो शेअर करताना, ‘चंदन दिव्याचा खरा चेहरा शिवासमोर आणू शकेल का…?’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
शिवा या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवाच्या सांगण्यावरून नेहाने आशूबरोबरच्या लग्नाला होकार दिला आहे. शिवाला विश्वास आहे की, आशूच्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे आणि तो ते तिच्यासमोर ते व्यक्त करील. परंतु, आता आशूने नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला आहे. त्यामुळे आता नेहा व आशूचे लग्न होणार का, शिवासमोर कीर्ती व दिव्याचे कारस्थान समोर येणार का, तसेच चंदन त्याचा निर्धार पूर्ण करू शकणार का हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.