‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘शिवा’ मालिकेत संपूर्ण देसाई कुटुंबाचा गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला. प्रभात फेरी आणि नाट्य सादरीकरणासह देसाई कुटुंबांनी गुढीपाडव्याचा आनंद लुटला.

शिवा मालिकेत गुढीपाडव्याचा सीन शूट करताना सिताई म्हणजेच मीरा वेलणकर यांनी साडी नेसून बाईक चालवली. आपल्या या अनोख्या अनुभवाबद्दल सांगताना मीरा म्हणाली, “सिताईसारख्या पात्राला बाईक शिकवली जात आहे असा प्रसंग आम्ही हल्लीच शूट केला आणि मला असा आगळावेगळा सीन शूट करायला मिळाला याचा प्रचंड आनंद आहे. मुंबईत फिल्मसिटीमध्ये आम्ही हा सीन शूट केला. तशी मला स्कुटी चालवता येते पण, गियरची बाईक मी कधीच चालवली नाही. गियर कुठे असतात हे ही आधी मला माहित नव्हतं. आमच्या मालिकेचे दिग्दर्शक त्यांनी आधी विचार केला होता की बाईक ढकलू आणि सीन पूर्ण करू, पहिला शॉट आम्ही तसाच केला पण मला काही मजा आली नाही. तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मला एक तरी शॉट असा द्यायचा आहे जिथे मी स्वतंत्रपणे बाईक चालवत आहे. ज्या दिवशी बाईकचा सीन होता त्याचदिवशी मी बाईक चालवायला शिकले. तुम्ही सर्वांनी तो सीन पाहिला असेलच, जिथे शिवा माझ्या बाईकच्या बॅकसीटवर येऊन बसते आणि माझी बाईक कंट्रोल करते हा शॉट देताना मी बाईक चालवली होती.

“त्या सीनमध्ये शिवा माझी बाईक चालवते आणि कंट्रोल करतेय असं दाखवलं आहे. पण, प्रत्यक्षात मध्ये तिचे हात बाईक कंट्रोल करण्यासाठी पुढे पोहचणं कठीण होतं. त्यावेळेस ती बाईक मी कंट्रोल करून चालवत होते. हा सीन शूट करताना खूप मजा आली आणि सेटवर सर्वांना आश्चर्य वाटलं. दिग्दर्शक सर म्हणाले कमाल… आणि अशाप्रकारे आम्ही तो सीन पूर्ण केला. हे फक्त मला ‘शिवा’ मालिकेमुळे करायला मिळत आहे.” असं मीरा वेलणकरने यावेळी सांगितलं.

दरम्यान, ‘शिवा’ मालिका १२ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. महिन्याभरापूर्वीच या मालिकेने आपली वर्षपूर्ती साजरी केली. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून टीआरपी सुद्धा चांगला आहे. यामध्ये पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, सिताईंची भूमिका अभिनेत्री मीरा वेलणकर साकारत आहे.