मालिकेत अचानक येणारे ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवतात, त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. आता असाच एक ट्विस्ट लोकप्रिय मालिका ‘शिवा'(Shiva)मध्ये येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘शिवा’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडताना दिसल्या. आशू-शिवामध्ये झालेले गैरसमज, आशूने शिवावर अविश्वास दाखवत तिला घर सोडून जाण्याचा सांगितलेला निर्णय, दोघांनी घटस्फोटाच्या पेपरवर केलेल्या सह्या व तितक्याच तातडीने ठरलेले नेहा व आशूचे लग्न या सगळ्यामुळे मालिका नेमकी कोणत्या वळणावर जाऊन पोहोचणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता ‘शिवा’ मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आईचा विरोध पत्करून आशू शिवाला निवडणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘शिवा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आशू शिवाला घेऊन मंडपात येतो. त्याच्या हातात घटस्फोटाचे पेपर आहेत. तो ते पेपर फाडतो व अग्नीमध्ये टाकतो. त्याची आई म्हणजेच सिताई त्याला तो हे काय करत आहे असं विचारते. त्यावर आशू तिला म्हणतो की, खूप आधी करायला हवं होतं. माझं शिवावरच प्रेम आहे आणि तीच माझ्यासाठी योग्य जोडीदार आहे. आशूचे हे बोलणे ऐकल्यानंतर सिताई म्हणते, “ही मुलगी जर घरात येणार असेल, तर ती माझ्या प्रेतावरून येईल.” त्यावर आशू म्हणतो, ती समजा या घरात येणार नसेल तर मीही या घरात पाऊल ठेवणार नाही. पुढे तो म्हणतो, “आम्ही छोट्याशा भाड्याच्या घरात राहू, पण निदान आम्ही सुखी राहू.” सिताई त्याला म्हणते, “बोलणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे.” त्यावर आशू म्हणतो, मी जेव्हा मोठा होईन ना, तेव्हा परत तुझ्याकडे येईन.”
हा प्रोमो शेअर करताना, “शिवाच्या प्रेमाखातर आशू सोडू शकेल का आपलं घर?”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘शिवा’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून आशू-शिवामध्ये मोठे गैरसमज निर्माण झाले होते. दिव्या-कीर्तीमुळे हे गैरसमज निर्माण झाले होते. मात्र, दिव्याचा नवरा चंदनने हे गैरसमज दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न केल्याचे पाहायला मिळणार आहे. आता आशूचा हा निर्णय ऐकून सिताई पुढे काय करणार, आशू-शिवाची केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.