टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. मनोरंजनात मालिकांचा मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळते. मालिकांमधील रंजक वळणे प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवतात. त्याबरोबरच मालिकेतील काही पात्रे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. ‘शिवा’ (Shiva) ही अशा मालिकांपैकी एक आहे. सर्वांच्या मदतीला धावून जाणारी, धाडसी शिवा सर्वांना आवडते. मात्र, सध्या तिच्या आयुष्यात मोठे संकट आल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. आशूचे नेहाबरोबर लग्न लावून दिले जात आहे. या सगळ्याला तिची बहीण दिव्या व आशूची बहीण कीर्ती जबाबदार आहेत. त्यांनी एकत्र येऊन शिवा व आशूमध्ये मोठे गैरसमज निर्माण केले आहेत. आता दिव्याचा पती चंदन तिचे सत्य शिवासमोर आणणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माझ्याकडे पुरावा…

शिवा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. प्रोमोच्या सुरुवातीला दिव्या व चंदन हे शिवाच्या गॅरेजमध्ये असल्याचे दिसते. चंदन दिव्याला म्हणतो, “मला सगळं खरं कळलंय दिव्या.” दिव्या त्याला म्हणते, “काहीही बडबडू नकोस. मला काही माहीत नाही.” दिव्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर चंदन तिला, “माझ्याकडे पुरावा आहे”, असे सांगत एक चिठ्ठी दाखवतो आणि म्हणतो, ” तू आशूला लिहिलेली ही चिठ्ठी.” त्यानंतर दिव्या चंदनला म्हणते, “हो मी सगळं केलं. कारण- जे मला मिळायला हवं होतं, ते तिला मिळालं. म्हणून मी शिवाबद्दल आशूच्या मनात राग निर्माण केला.” दिव्याचे हे बोलणे शिवा ऐकत असते. दिव्याची कबुली ऐकून तिच्या हातातील पाना खाली पडतो. शिवाला धक्का बसल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. शिवा दिव्याच्या समोर येते आणि तिच्या कानाखाली मारते. प्रोमोच्या शेवटी दिव्या हात जोडताना दिसत आहे.

शिवा मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “चंदनमुळे शिवाला कळणार दिव्याच्या कारस्थानाचं सत्य..!!”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे आशू शिवाच्या वाढदिवशी त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिच्याकडे जात असताना दिव्याने त्याला एक चिठ्ठी दिली होती. शिवा खोटे वागत असल्याचे तिने त्याला पटवून दिले होते. दिव्या व कीर्ती यांनी एकत्र येत आशूच्या मनात शिवाविषयी गैरसमज निर्माण केले होते. या सगळ्याच्या परिणामी आशूने शिवाला घराबाहेर काढले होते. दोघांनी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या होत्या. मात्र, शिवाला तिच्या प्रेमावर आणि आशूवर विश्वास असल्याचे तिने वेळोवेळी सांगितले. दुसरीकडे, आशूने मात्र नेहाबरोबरच्या लग्नाला होकार दिला. नेहाने शिवाच्या सांगण्यावरून आशूबरोबरच्या लग्नाला होकार दिला होता. आता मात्र, आशू-नेहाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. दिव्या व कीर्ती बोलत असताना चंदनने पाहिले होते. त्यामुळे चंदनला दिव्यावर संशय आला होता. त्यानंतर शिवाचा संसार वाचविण्यासाठी त्याने पुरावे गोळा करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले.

आता दिव्याचे सत्य समोर आल्यानंतर शिवा काय पाऊल उचलणार, आशू व इतर कुटुंबासमोर स्वत:ला सिद्ध करणार का आणि दिव्या व कीर्तीचे सत्य समोर आणणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiva upcoming twist new promo when shiva comes to know about divyas intrigue she will slap her watch nsp