चित्रपट, मालिका, नाटकांतील अशी काही पात्रे असतात, जी त्यांच्या वेगळेपणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. अनेकदा विनोद, वेशभूषा, बोलण्याची खास शैली, स्वभाव व इतर अशा अनेक गोष्टी; यामुळे ही पात्रे इतरांपेक्षा वेगळी वाटतात. चाहत्यांना अनेकदा ती जवळची वाटतात. असेच वेगळेपण असणारं पात्र म्हणजे शिवा हे आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘शिवा'(Shiva) या मालिकेतील हे पात्र आहे. धाडसी, छोटे केस असलेली, वेळप्रसंगी मारामारी करणारी, स्वत:चे गॅरेज असणारी व त्यामध्ये काम करणारी, कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असणारी, मुलांसारखी वेशभूषा करणारी ही शिवा प्रेक्षकांचे सतत लक्ष वेधून घेते. तिचे हे वेगळेपण प्रेक्षकांना भावताना दिसते. शिवाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आलेले पाहायला मिळाले. आता शिवा तिच्या जुन्या अवतारात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाच्या एरियात येऊन पोरींना छेडणार…

झी मराठी वाहिनीचा सोशल मीडियावर ‘शिवा’ मालिकेचा प्रोमो पाहायला मिळत आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला सिताई व किर्ती शिवाच्या गॅरेजमध्ये येतात व तिला तिचे कपडे देत म्हणतात, “शिवा हे तुझे जुने कपडे. एवढंच राहिलं होतं तुझं आमच्या घरी.” किर्ती म्हणते, “तुझा आता काहीच संबंध उरलेला नाहीये.” शिवा सिताईच्या हातातील तिचे कपडे स्वत:कडे घेत म्हणते, “तुम्ही खूप सोपं केलं माझ्यासाठी, कारण आशू माझ्या प्रेमात पडला ना तो याच रूपात.” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, दोन मुली रस्त्यावरून जात असताना तेथील मुले त्यांची छेड काढतात. त्यातील एका मुलीचा ते हात पकडतात, तितक्यात शिवा येते. शिवा गाडीवर बसली आहे. लग्नाआधी शिवा जशी दिसायची तशीच पाहायला मिळत आहे. ती म्हणते, “शिवाच्या एरियात येऊन पोरींना छेडणार तुम्ही? यांना बघून अशी वाट नाही बदलायची, यांची वाट लावायची, असे म्हणत ती त्या गुंडांना मारते.

‘शिवा’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, शिवा तिच्या स्टाईलमध्ये पुन्हा दिसणार, आशू तिच्या पुन्हा प्रेमात पडणार..? अशी कॅप्शन दिली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी कमेंट्स करत शिवाचे कौतुक केले आहे. तिला तिच्या मूळ रूपात पाहून प्रेक्षकांना आनंद झाल्याचे कमेंट्सवरून दिसत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “वाह! अखेरीस शिवा तिच्या मूळ रूपात आली आहे. आता ‘शिवा’ मालिका पाहायला खूप मजा येणार.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “कडक, ओरिजनल स्टाइल”, असे म्हणत कौतुक केले आहे. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “लय भारी.”

हेही वाचा: Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या दमदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार

मालिकेत दाखविल्याप्रमाणे शिवाची बहीण दिव्या व आशूची बहीण किर्ती या दोघींनी शिवा-आशूमध्ये गैरसमज निर्माण केले आहे. यामधूनच आशूने शिवाला घराबाहेर काढले. शिवा आता तिच्या माहेरी राहते. लग्नानंतर तिचा लूक बदललेला पाहायला मिळाला होता, आता पुन्हा एकदा शिवा तिच्या मूळ रूपात दिसत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiva upcoming twist will be seen again in her old style will fight netizens praised marathi serial nsp