गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम खूप चर्चेत आहेत. याचं कारण आहे ‘सीआयडी २’ मालिका. या मालिकेत अचानक शिवाजी साटम यांनी साकारलेलं पात्र एसपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी साटम यांची ‘सीआयडी २’ मालिकेतून एक्झिट झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी एका लोकप्रिय अभिनेत्याची वर्णी लागली आहे. पण, लवकरच शिवाजी साटम यांची ‘सीआयडी २’ मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या आठवड्यात ‘सीआयडी २’ मालिकेतील एसीपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यामुळे मालिकेतील चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्राचा हवाला देत ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे की, एसीपी प्रद्युमन हे आयकॉनिक पात्र आहे. त्यामुळे ते कधीही मरणार नाही. काही आठवड्यात शिवाजी साटम यांची ‘सीआयडी २’ मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार आहे.

तसंच शिवाजी साटम यांच्या जागी अभिनेता पार्थ समथानने एन्ट्री घेतली असून तो थोड्या काळासाठी या मालिकेचं शूटिंग करणार आहे. भूतकाळात पात्रांना मारून पुन्हा मालिकेत आणण्याचे ट्विस्ट अनेकदा पाहायला मिळाले आहेत. त्याप्रमाणेच शिवाजी साटम यांना मालिकेत परत आणलं जाणार आहे. काही आठवड्यात त्यांच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे, अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे. १९९८ मध्ये ‘सीआयडी’ मालिका सुरू झाल्यापासून शिवाजी साटम एसीपी प्रद्युमनच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, ‘सीआयडी २’ मालिकेत अभिनेता पार्थ समथान एसीपी आयुष्मानच्या भूमिकेत झळकणार आहे. सुरुवातीला पार्थने ‘सीआयडी २’ मध्ये काम करण्यास नकार दिला होता. पण, त्यानंतर तो या मालिकेत काम करण्यास तयार झाला. पार्थच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर. त्याने ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. या मालिकेत तो पृथ्वी सान्यालच्या भूमिकेत दिसला होता. पण ‘कैसी ये यारियां’मधील माणिक मल्होत्राच्या भूमिकेमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला नवीन ओळख मिळाली. यामध्ये त्याच्याबरोबर नीति टेलर दिसली होती. या मालिकेचे पाच सीझन प्रदर्शित झाले आहेत. यानंतर, पार्थ एकता कपूरच्या ‘कसोटी जिंदगी की २’ मध्ये अनुराग बसूच्या भूमिकेत दिसला. मग २०२४ मध्ये ‘घुडाचढी’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात संजय दत्त, खुशाली कुमार, रवीना टंडन आणि अरुणा इराणी महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.