Shivaji Satam : टेलिव्हिजनवरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘सीआयडी’ ही मालिका. गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. १९९८ मध्ये ही मालिका सुरू झाली होती. यानंतर २० वर्षे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर २०१८ मध्ये ही मालिका बंद करण्यात आली होती. पण, चाहत्यांच्या मागणीमुळे या मालिकेचा नवा सीझन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला.

शिवाजी साटम ‘सीआयडी’मध्ये पुन्हा दिसणार?

मात्र काही दिवसांपुर्वी या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची एक्झिट झाल्याचे दाखवण्यात आलं. या मालिकेत बॉम्बस्फोटात एसीपी प्रद्युम्न यांचा जीव जाणार असल्याचे काही वृत्तांमधून समोर आले. त्यांच्याऐवजी पार्थ समथानने नवीन एसीपी म्हणून मालिकेमध्ये प्रवेश केला. एसीपी प्रद्युम्न यांच्या निधनानंतर चाहते खूप दुःखी झाले. पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे शिवाजी साटम पुन्हा या मालिकेमध्ये दिसणार आहेत.

पार्थ समथानने शेअर केली इन्स्टाग्राम स्टोरी

अभिनेता पार्थ समथानने स्वत: याबद्दलची महिते दिली आहे. पार्थ समथानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शिवाजी साटम यांची भेट घेताना दिसत आहे. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केलं असल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओसह त्याने “एसीपी प्रद्युम्न उर्फ ​​शिवाजी साटम यांच्याबरोबर शूटिंग करताना खूप आनंद झाला आणि मनोरंजनही झाले. खूपच भारी माणूस.” असं म्हटलं आहे.

पार्थच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चाहते उत्सुक

दरम्यान, पार्थने शिवाजी साटम यांच्याबरोबर शूटिंग केल्याचा हा खास व्हिडीओ शेअर केला असला तरी शिवाजी साटम पुन्हा या मालिकेत येणार आहेत की नाही याबद्दलची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वाहिनीकडून किंवा मालिकेच्या निर्मात्यांकडूनही याबद्दल अद्याप काही सांगितलेलं नाही. परंतू, पार्थने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे मालिकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकजण एसीपी प्रद्यूम्न यांची मालिकेत येण्याची वाट पाहत आहेत.

शिवाजी साटम ‘सीआयडी’मध्ये खरंच पुन्हा दिसणार का?

शिवाजी साटम यांनी मालिका सोडल्याच्या बातमीने अनेक चाहते नाराज झाले होते आणि त्यामुळेच लोकांच्या मागणीनुसार त्यांना मालिकेत परत आणले जात आहे का? असं म्हटलं जात आहे. शिवाय शिवाजी साटम म्हणजेच एसीपी प्रद्युम्न यांचे मालिकेमध्ये स्वतःचे वेगळे स्थान आहे आहे. त्यांचे अनेक संवादही मालिकेमध्ये नावीन्य आणतात. त्यामुळे आता एसीपी प्रद्युम्न मालिकेमध्ये कधी दिसणार? हे पाहणे बाकी आहे. ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.