सध्या मराठी मालिकाविश्वातील नवनवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाल्या आहेत. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच दोन नवीन मालिका सुरू होत आहेत. रेश्मा शिंदे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार, उदय नेने, आरोही सांबरे अभिनीत ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका १८ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. संध्याकाळी ७.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. त्यामुळे सध्या या वेळेत सुरू असलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ नवीन वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता दुसरी नवी मालिका ‘साधी माणसं’ याची वेळ समोर आली आहे.
अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘साधी माणसं’ या मालिकेची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. त्यामुळे आता ही नवी मालिका कोणत्या वेळेत भेटीस येणार? आणि कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? किंवा नव्या वेळेत सुरू होणार, याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. आता ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘साधी माणसं’ या नव्या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा – Video: साखरपुड्यात प्रथमेश परबचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
‘साधी माणसं’ ही नवी मालिका १८ मार्चपासून सुरू होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता शिवानी व आकाश ही नवी जोडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या या वेळेत सुरू असलेली ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार? की नव्या वेळेत भेटीस येणार हे येत्या काळातचं स्पष्ट होईल.
हेही वाचा – “हा दुग्ध शर्करा योगच…”, प्रथमेश लघाटने सांगितला लग्नानंतर पहिल्यांदाच घडलेला ‘हा’ आनंदाचा क्षण, म्हणाला…
दरम्यान, ‘साधी माणसं’ या मालिकेत शिवानी ‘मीरा’ तर आकाश ‘सत्या’च्या भूमिकेत झळकणार आहे. मीरा ही फुलविक्रेती आहे, तर सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.