‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लोकमान्य’ व ‘३६ गुणी जोडी’ या मालिका कमी टीआरपीमुळे बंद होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं होतं. ही गोष्ट ताजी असतानाच आता ‘झी मराठी’वरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. ‘लागिर झालं जी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लाडकी शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकरची ‘लवंगी मिरची’ लवकरच बंद होणार आहे. आणि याचंही कारण टीआरपीच आहे.
अभिनेत्री शिवानी बावकरची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका जी तिच्या पहिल्या मालिकेपेक्षा जास्त काळ चालेली नाही. अभिनेत्रीच्या ‘लागिर झालं जी’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. २०१७ साली सुरू झालेली ही मालिका २०१९ पर्यंत चालली होती. त्यानंतर शिवानीची ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी’ व ‘कुसुम’ प्रेक्षकांच्या भेटीस आली. पण या मालिका जास्त काळ टिकाव धरू शकल्या नाहीत. या दोन्ही मालिकांनाही सहा महिन्यात गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर आता शिवानीची ‘लवंगी मिरची’ ही तिसरी मालिका आहे, जी अल्पावधीत बंद होत आहे.
हेही वाचा – “नको गं नको” मृण्मयी देशपांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवर बिग बॉस फेम ‘अभिनेत्याची’ प्रतिक्रिया
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरची अर्जुन-सायलीची पहिली भेट कशी होती?, जाणून घ्या
१३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झालेली ‘लवंगी मिरची’ ही मालिका प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस उतरली नाही. तसेच या मालिकेचा टीआरपीही कमी होता. त्यामुळे ‘लवंगी मिरची’ मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा – टोमॅटोचे भाव कमी होतील का? महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? मराठी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या मालिकेचे टेलिकास्ट होणार आहे. त्यानंतर या मालिकेच्या जागी ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ पाहायला मिळणार आहे.