Shivani Rangole Post : सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका डॉ. वीणा देव यांचं अल्पशा आजाराने मंगळवारी ( २९ ऑक्टोबर ) निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. वीणा देव या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई, तर लेखक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. तसेच मृणाल कुलकर्णी यांच्या आई या नात्याने त्या अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या आजेसासुबाई होत्या. त्यामुळे वीणा देव यांच्या निधनानंतर शिवानीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.
शिवानी रांगोळेची भावनिक पोस्ट
शिवानीने डॉ. वीणा देव यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर करत जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. अभिनेत्री लिहिते, “त्या नेहमी म्हणायच्या की, आपल्या सवयी सारख्या आहेत. दोघींना सतत थंडी वाजत असायची म्हणून प्रवासात मोजे बरोबर ठेवायची सवय, फुलांची आणि फुलं असणाऱ्या कपड्यांची प्रचंड आवड, पुस्तकांची प्रचंड आवड, दुपारची विश्रांती प्रिय!! बाहेर जेवायला गेलो तर शेअरिंगसाठी नेहमी आमचा एक गट व्हायचा. मला शूटिंग करताना कुठलाही मराठी शब्द अडला तर मी हक्काने कधीही फोन करायचे आणि त्या ही Patiently मला शिकवायच्या. मध्यंतरी कागदावर कविता लिहून मला पाठवायच्या. माझी सीरियल अगदी हॉस्पिटलमध्ये सुद्धा न चुकता पाहायच्या! माझा आवाज बैलाच्या गळ्यातल्या घुंगरासारखा आहे असं म्हणायच्या विराजसला. गमतीशीर किस्से सांगताना डोळ्यांत चमक यायची त्यांच्या… गो.नी. दांचं भ्रमणगाथा वाचताना मी भारावून जाऊन फोन/msg करायचे तेव्हा खूप आनंद व्हायचा त्यांना. हा वारसा जपायचा आहे तुम्ही असं प्रेमाने नेहमी सांगायच्या. त्यांच्यातला शांतपणा, सात्विक भाव आणि विचारांची श्रीमंती मृणाल ताई, मधुरा मावशी, विराजस आणि राधामध्ये पुरेपूर जाणवते. त्यांचा कठीण काळ विसरून, फक्त आणि फक्त त्यांच्या याच हसऱ्या आठवणीबरोबर घेऊन आता जगायचे आहे. त्या बघत आहेत, त्यांना कौतुक असणार आहे म्हणून काम करण्याचा हुरूप यायचा आणि येईल, इथून पुढे नेहमीच!”
डॉ. वीणा देव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं. आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी देखील दु:ख व्यक्त करत भावुक पोस्ट शेअर केली होती.
दरम्यान, पती डॉ. विजय देव, त्यांच्या दोन मुली मृणाल आणि मधुरा आणि जावई रुचिर कुलकर्णी ( मृणाल कुलकर्णींचे पती ) यांच्यासमवेत वीणा देव यांनी गो. नी. दांडेकर यांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे साडेसहाशेहून अधिक प्रयोग केले आहेत. याशिवाय मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो. नी. दांडेकर यांच्या दुर्मिळ साहित्यकृती देखील प्रकाशित केल्या होत्या.