Shivani Sonar & Ambar Ganpule Sangeet Ceremony : सध्या मराठी कलाविश्वात अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. २१ जानेवारीला ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. यानंतर अंबर व शिवानी विवाहबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अंबर-शिवानीची लग्नघटिका आता समीप आली आहे.
सध्या अंबर-शिवानीच्या घरी लग्नाआधीचे विधी पार पडत आहेत. अष्टवर विधी, हळद, मेहंदी, ग्रहमख पूजा पार पडल्यावर नुकताच या दोघांचा संगीत सोहळा पार पडला. मराठी कलाविश्वातील कलाकार आणि या जोडप्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. अंबर-शिवानीच्या संगीत सोहळ्यातील Inside व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
अंबर-शिवानीचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स
अंबर व शिवानी संगीत सोहळ्यात ‘Ra Ra Reddy..I’m Ready!’ या दाक्षिणात्य गाण्यावर थिरकले आहेत. या दोघांची एनर्जी आणि जबरदस्त डान्स पाहून उपस्थित पाहुण्यांनी एकच जल्लोष केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. याशिवाय या जोडप्याने ‘काटी रात मैंने खेतों में तू आई नहीं’ या ‘स्त्री २’ चित्रपटातील गाण्यावर सुद्धा बेभान होऊन डान्स केला.
अंबर-शिवानीच्या संगीत सोहळ्यातील डान्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या दोघांनीही या कार्यक्रमाला खास इंडो-वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय अंबर-शिवानीने त्यांच्या लग्नात दोघांच्या नावाची फोड करून खास ‘#AmbAni Wedding’ असा हॅशटॅग वापरला आहे. २१ जानेवारी म्हणजेच उद्या ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.
दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर शिवानी सोनारला ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे घराघरांत एक नवीन ओळख मिळाली. तिने या मालिकेत संजू हे पात्र साकारलं होतं. तर, अंबर गणपुळे ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाला होता. त्याने ‘दुर्वा’ मालिकेत सुद्धा मध्यवर्ती भूमिका साकारली होती.