‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी सोनार २१ जानेवारीला लग्नबंधनात अडकली. ‘रंग माझा वेगळा’, ‘लोकमान्य’ मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुळेशी शिवानीने लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. दोघांचं मोठ्या थाटामाटात लग्न पार पडला. शिवानी व अंबरच्या लग्नाला मराठी मालिकाविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. पण, लग्नाच्या बोलणीआधी शिवानीने घरच्यांना एक ताकीद दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळेने नुकताच ‘राजश्री मराठी’ युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी दोघांना विचारलं की, घरी जास्त मनधरणी करावी लागली नाही का? घरचे लग्नासाठी लगेच हो म्हणाले का? यावर अंबर म्हणाला, “माझी आई एवढंच म्हणाली की, तुम्ही दोघं मोठे आहात. तुम्ही एकाच क्षेत्रातले आहात. तिकडे चढ-उतार काय आहे? हे माहीत आहे. त्या गोष्टींबद्दल दोघांमध्ये आधी चर्चा करा आणि त्यानंतर निर्णय घ्या. दोघांमध्ये पुढे जाऊन समस्या निर्माण नको व्हायला. मग आमचं तसं बोलणं झालं. बाकी आमच्याकडे अशी काही समस्या नव्हती.”

पुढे शिवानी सोनार म्हणाली, “आमच्याकडे असं झालं की, हिचा आता लग्नाचा मूड नव्हता. मग ही अचानक, भयानक लग्नाचा विषय काढतेय. तर मग माझ्या घरच्यांना असं झालं की, लग्नाचा विचार करतेय याचा अर्थ काहीतरी चांगलं घडलेलं दिसतंय. चांगलं कोणीतरी भेटलंय म्हणून शिवानी पटकन निर्णय घेतेय. ज्या अर्थी हिचा सहा महिन्यात मूड बदलला आहे, त्या अर्थी काहीतरी चांगलं घडतंय. मग माझे आई-बाबा याला भेटले. त्यांना तो खूप आवडला.”

त्यानंतर अंबर गणपुळे म्हणाला की, त्यावेळेला मला हिची एक गोष्ट फार आवडली होती. मी जेव्हा तिला प्रपोज केलं. त्याच्याआधी मी तिला माझी परिस्थिती सांगितली होती. माझं घर नाहीये. मला अमुक-तमुक गोष्टी करायच्या आहेत. घर घेईन म्हटलं. पण, आता एवढ्यात कुठेतरी मला दिसत नाहीये. त्यामुळे अशी परिस्थिती आहे. आता तू सांग तुला करायचं आहे की नाही? उद्या जाऊन असं नको व्हायला, तू हे सांगितलं नाहीस.

“जेव्हा तिचे घरचे बोलायला येणार होते, तेव्हा तिने घरच्यांना हे सांगितलं होतं की, त्याला तुम्ही काहीही विचारा. पण त्याला तुम्ही घराबद्दल काही विचारायचं नाही. कारण मला काही समस्या नाही उद्या भाड्याच्या घरात राहायला. त्यामुळे हे सोडून सगळं विचारा. कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नाहीये. त्याच्या डोक्यात काय आहे, हे मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही हे विचारू नका. देवाच्या कृपेने आणि नशीबाने लग्नाच्या आधीच घर घेतलं. पुण्यामध्ये घर घेतलं. मी तिला म्हटलं, तू जास्त त्याच्या मागे लागली नाहीस म्हणून स्वतःचं घर घेतलं,” असं अंबर गणपुळे म्हणाला.

नंतर शिवानी सोनार म्हणाली, “आमचा गुढीपाडव्याच्या दिवशी साखरपुडा झाला. दसऱ्या दिवशी नवं घर घेतलं. मी खूप खुश झाले. आमच्या बाबतीत अशा गोष्टी खूप वेळेला घडतात. जास्त वेळा मागितली नाही ना तर ते आपोआप मिळत. हे आमच्या दोघांच्या बाबतीत नशीबाने होतं. एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्या मागे लागतं नाही. शांतपण केलं तर सगळं होतं.”