Shivani Sonar : लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार ‘झी मराठी’च्या ‘तारिणी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तारिणी बेलसरे ही मुंबईत राहणारी अंडरकव्हर कॉप आहे जी आपल्या आईचं सत्य शोधून काढण्यासाठी आणि खऱ्या गुन्हेगाराला जगापुढे आणण्यासाठी पोलिसांत भरती होते. ही मालिका ११ ऑगस्टला सुरू झाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘तारिणी’बद्दलच्या काही गोष्टी शिवानी सोनारने शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री म्हणते, “तारिणीला अल्पावधीतच इतकं प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार… तारिणीच्या प्रोमो शूटसाठी आम्ही पहिल्या दिवसापासून अ‍ॅक्शन सीन शूट करत आहोत. यावेळी मी नऊवारी साडी नेसून अ‍ॅक्शन सीन शूट केला. खरंतर, अशाप्रकारे शूट करणं हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि तो प्रोमो पूर्ण केला.”

“मात्र, प्रोमो शूटच्या रात्री मी अ‍ॅक्शन सीन करताना धडपडले. त्या अ‍ॅक्शन सीनमध्ये मला गुंडाला लाथ मारायची असते असा सीन होता आणि त्यानंतर धावायचं होतं. पण, या दरम्यान धावताना माझा बूट अडकला आणि मी पडले. त्यामुळे माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. अजूनही तो खांदा रिकव्हर होत आहे. आता अशाप्रकारच्या सगळ्या सीन्ससाठी मी माझ्या मनाची तयारी केली आहे. कारण, आमच्या मालिकेचं नावच ‘तारिणी’ आहे. त्यामुळे अ‍ॅक्शन सीन हे वारंवार करावे लागणारच… आपण कितीही काळजी घेतली आणि सतर्कता पाळली तरीही अ‍ॅक्शन म्हटलं की लागणं-पडणं या गोष्टी होतात.”

शिवानी सोनार पुढे सांगते, “मला या भूमिकेसाठी प्रोडक्शन हाऊसमधून कॉल आला होता. ‘झी मराठी’ एक मालिका करत आहे तर, तुला ऑडिशन द्यायला आवडेल का आणि त्यानंतर मी ऑडिशन दिली. मग मालिकेच्या हिरोच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू होत्या. मुख्य अभिनेत्याबरोबर लूकटेस्ट दिली आणि तारिणी- केदारची जोडी फायनल झाली. अशाप्रकारच्या भूमिका खूपच कमी लिहिल्या जातात खास करून महिला पात्रांसाठी… आणि अशी भूमिका साकारायची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे.”

“जेव्हा मला प्रोडक्शनमधून फोन आला तेव्हा मी घरीच होते आणि मी सर्वांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली, सर्व खूश झाले. माझी ‘झी मराठी’बरोबरची ही पहिली मालिका आहे. याआधी मी ‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं. तेव्हापासून मॅनिफेस्ट केलेली गोष्ट आता पूर्ण झाली आहे. मला टीमही तितकीच छान मिळाली आहे. प्रोमोला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. एकही वाईट कमेंट आली नव्हती. माझ्या घरचेही म्हणाले किती जबरदस्त अ‍ॅक्शन केली आहेस तू…”

“तारिणी’च्या सेटवर सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. अगदी यातील कलाकारांबरोबर सुद्धा मी पहिल्यांदाच काम करतेय. आमचे निर्माते तेजस सर आणि शर्मिष्ठा ताई, दिग्दर्शक भीमराव मुढे सर आणि सगळी टीम खूप छान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी अभिज्ञाबरोबर माझी मेकअप रूम शेअर करते, त्यामुळे तिच्याबरोबर मैत्री थोडी जास्त आहे. इतक्या उत्तम कलाकारांबरोबर काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना हेच सांगेन की, मला वाटतं प्रत्येक स्त्री तारिणी आहे कारण, ती आपल्या माणसांवर, कुटुंबीयांवर खूप प्रेम करते. कोणतीही अडचण येते तेव्हा ती दुर्गेचं रूप धारण करते, वाईट प्रवृत्तीपासून कुटुंबीयांचं रक्षण करण्यासाठी कायम खंबीरपणे उभी राहते.” असं शिवानी सोनारने सांगितलं.