छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. अशीच एक बहुचर्चित मालिका आज ( १७ जून २०२४ ) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे यामधील कलाकार. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर याआधी काम केलंय अशी लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे तब्बल ९ वर्षांनी पुन्हा एकदा या वाहिनीवर पुनरागमन करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ असावं लागतं. ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतूनही अशाच एका सुंदर नात्याची गोष्ट उलगडेल. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून शिवानीसह ‘गोठ’ मालिकेमधून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता समीर परांजपे मुख्य भूमिका साकारेल. याशिवाय अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील या मालिकेच्या निमित्ताने तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करणार आहे.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हाने लग्नाआधी झहीर इक्बालच्या कुटुंबासह घालवला वेळ, होणाऱ्या नणंदेने शेअर केला Family Photo

नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानी सुर्वेची पोस्ट

शिवानी सुर्वेने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री लिहिते, “१२ वर्षांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ परिवाराबरोबर एक प्रवास सुरु केला होता. जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला. ‘देवयानी’ला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आपलंस केलं, आजपर्यंत मनात ठेवलं. आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करते आहे. ‘स्टार प्रवाह’च्या ‘थोड तुझं आणि थोड माझं’ या मालिकेच्या निमित्ताने मी पुन्हा येणार आहे तुम्हाला भेटायला… या ‘मानसी’वर सुद्धा असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे की, ‘मानसी’सुद्धा तुमचं मन नक्की जिंकेल. तुमच्या शुभेच्छा अन् शुभाशीर्वाद कायम राहुद्यात.”

हेही वाचा : Video : मैनू विदा करो…; ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील पिहूने अरिजित सिंहचं गाणं गात प्रेक्षकांचे मानले आभार, जुन्या आठवणींना दिला उजाळा

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ प्रस्तुत ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेची निर्मिती अतुल केतकर आणि अपर्णा केतकर यांच्या राईट क्लिक मीडिया सोल्युशन्स या निर्मिती संस्थेने केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. ही मालिका १७ जून म्हणजेच आजपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. प्रेक्षकांनी सुद्धा शिवानी सुर्वेला या नव्या मालिकेसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivani surve thoda tuza ani thoda maza serial will start from today actress shared special post sva 00