अभिनेत्री शिवानी सुर्वे ‘देवयानी’ या मालिकेतून घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने अनेक हिंदी, मराठी मालिका केल्या. मग शिवानीने ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नंतर तिच्या ‘झिम्मा २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सध्या शिवानी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शिवानीने नुकतीच सोशल मीडियावर पती अजिंक्य ननावरेसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वेने अभिनेता अजिंक्य ननावरे याच्याशी १ फेब्रुवारी २०२४ला लग्नगाठ बांधली. दोघांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक लग्नसोहळा शिवानी-अजिंक्यचा झाला होता. दोघांच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार मंडळींनी खास हजेरी लावली होती. शिवानी-अजिंक्यच्या लग्नाला आता दुसरं वर्ष सुरू आहे. शिवानीने अजिंक्यच्या वाढदिवसानिमित्ताने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

अजिंक्य ननावरेच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत शिवानी सुर्वेने लिहिलं, “माझ्या आयुष्यातलं प्रेम, माझा सर्वात चांगला मित्र आणि माझा सर्वात मोठा आशीर्वाद याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू तुझ्या प्रेमाने, हास्याने आणि तुझ्या सुंदर मनाने माझे जग उजळवले आहेस. हे वर्ष माझ्या आयुष्यात तू आणलेल्या सर्व आनंदाने भरून येवो, अशी मी प्रार्थना करते. शब्दांतून जितकं व्यक्त करते, त्याच्यापेक्षाही खूप जास्त मी तुझ्यावर प्रेम करते.”

दरम्यान, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या शिवानीची ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत शिवानीने साकारलेली मानसी आता घराघरात पोहोचली आहे. तसंच अजिंक्य ‘वाडा चिरेबंदी’ नाटकात काम करत आहे. मे महिन्यात या नाटकाचा अमेरिका दौरा होणार आहे. ३ मेपासून ते २५ मेपर्यंत ‘वाडा चिरेबंदी’ नाटक अमेरिकेत पाहता येणार आहे.