कॉमेडी क्वीन अशी ओळख मिळवलेली श्रेया बुगडे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे श्रेया घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत श्रेया प्रेक्षकांना खळखळवून हसवते.
अनेक मराठी सेलिब्रिटींप्रमाणेही श्रेया बुगडेनेही गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. याचे फोटो श्रेयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. श्रेयाने घरातील बाल्कनीत गुढी उभारुन पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. पतीबरोबरचे फोटो शेअर करत श्रेयाने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्यासाठी श्रेयाने पारंपरिक लूक केला होता. हिरव्या रंगाची साडी नेसून त्यावर डिझायनर ब्लाऊज श्रेयाने परिधान केला होता. गळ्यात काळे मणी व डायमंड असलेलं मंगळसूत्र तिने घातलं होतं. श्रेयाच्या या मंगळसूत्राने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
श्रेयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. याबरोबरच तिने चित्रपटांत काम करुन मोठ्या पडद्यावरही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘चला हवा येऊ द्या’ मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.