Shreya Bugde on Chala Hawa Yeu Dya : ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. १० वर्षे महाराष्ट्राला खळखळून हसवल्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, या शोमधील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणांनी कायमच चर्चेत राहत असतात. ‘चला हवा येऊ द्या’मधून भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांच्यासह अभिनेत्री श्रेया बुगडेही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या शोमधून श्रेयाने तिच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे श्रेयाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोआधी ती काही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती, पण तिला खरी लोकप्रियता मिळाली ती या शोमुळेच. मात्र, सुरुवातीच्या काळात तिला या शोमध्ये काम करणं काहीसं कठीण गेलं होतं. याबद्दल तिने स्वत:च भाष्य केलं आहे. श्रेया बुगडेने नुकतीच आयुष्याची जय या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यान श्रेयाने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सुरुवातीला काम करणं थोडं कठीण गेल्याचं सांगितलं. शिवाय तिने एक प्रसंगदेखील सांगितला.

याबद्दल श्रेया असं म्हणाली की, “आयुष्यात एखादी अशी घटना असते की ती तुमच्यात राहून जाते. तुम्ही कुठे तरी कच खात असता. तुमचं मन तुम्हाला एक सांगत असतं आणि तुम्हाला एक करायचं असतं; तर आत्ता आठवणीत असलेली गेल्या आठ-दहा वर्षातली हीच एक आठवण आहे, ती म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ सुरू असताना एक पॉइंट असा आला की, मला जे करायचं आहे ते मला इथे करता येत नाहीय किंवा तिथे मी माझी जागा निर्माण करण्यासाठी तेवढी सक्षम नाहीये.”

यापुढे श्रेया असं म्हणाली की, “तिकडे सगळेच दिग्गज आणि त्यांच्या कामात ते सगळेच वाघ होते, मुरलेले होते. मी तेव्हा नुकतीच नवीन नवीन होते आणि त्यांच्यात मिसळून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते; तर एका रात्री मी गाडीत बसले आणि खूप रडले. आईला फोन केला आणि मी तिला सगळं काही सांगितलं की, मला जे हवं आहे ते मला इथे मिळत नाहीय. शिवाय कलाकार म्हणून कायमच आपण भुकेले असतो आणि ते मिळालं नाही की असं वाटतं, नाही यार, हे होतच नाहीय. ते तुम्हाला झोपूच देत नाही किंवा काही करूच देत नाही; अस्वस्थ करून टाकतं.”

यापुढे श्रेयाने सांगितलं की, “मी आईला सांगितलं की, आई हे नाही होत आहे. तर आईने सांगितलं की, नाही… नाही… आपण थोडं थांबू. थोडी तग धरू, तू अशी कच कधीच खाल्लेली नाहीस. जर हे तुझ्या आयुष्यात आलं आहे तर ते नक्कीच एका कारणासाठी आलं आहे, त्यामुळे थांब. आपण बघू पुढे काय होत आहे आणि आपण सगळेच आपल्या आईचं ऐकतो तसं मीदेखील ऐकलं आणि आज मी इथे आहे.”